महिलांविरुद्धच्या क्षुल्लक तक्रारींचाही वरिष्ठांकडून आढावा

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी महिलांविरुद्धच्या बारीकसारीक तक्रारींचाही आढावा घेण्यास सुरुवात

प्रतिनिधी, मुंबई | January 3, 2013 1:45 AM

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी महिलांविरुद्धच्या बारीकसारीक तक्रारींचाही आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रामुख्याने याच प्रकारच्या तक्रारींकडे लक्ष पुरविले आहे. यामुळे आता महिलांविरुद्धच्या अदखलपात्र गुन्ह्य़ांकडेही पोलीस ठाण्यांना गांभीर्याने पाहावे लागत आहे.महिलांच्या तक्रारी प्रामुख्याने अदखलपात्र स्वरूपात नोंदवून घेतल्या जात असत. समोरच्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून दम दिला जात आहे. परंतु नंतर दम दिलेली व्यक्तीच संबंधित महिलेला धमकावत असे. त्यामुळे त्या महिलेची पुन्हा पोलीस ठाण्यात जाण्याची हिंमत होत नसे. अशातच एखाद्या महिलेने हिंमत दाखविलीच तर अ‍ॅसिड हल्ला वा हल्ल्याचे शस्र वापरले जात होते. अशा तक्रारी पुन्हा पोलीस ठाण्यात नोंदल्याही जात नव्हत्या. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा अत्याचार अधिकच वाढत होता. याची कल्पना असतानाही पोलीस ठाण्याकडून काहीही कारवाई केली जात नव्हती. दिल्लीतील घटनेनंतर मात्र आता वरिष्ठ अधिकारीच रस घेऊ लागल्यामुळे पोलीस ठाण्यांनीही आता महिल्यांविरुद्ध तक्रारी नोंदवून घेऊ लागले आहेत. इतकेच नव्हे तर या तक्रारींचा पाठपुरावाही केला जात आहे. त्यामुळे संबंधित महिलांनाही आता धीर येऊ लागला आहे. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिल्लीतील घटनेनंतर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिलांविरुद्धच्या सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश दिले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी सात कलमी कार्यक्रमही तयार केला होता. त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविली होती. त्याचा आढावा आयुक्त तसेच सहआयुक्तांकडून घेतला जात असल्यामुळे पोलीस ठाण्यावरही कारवाईचा दबाव असल्याचे दिसून येत आहे.

First Published on January 3, 2013 1:45 am

Web Title: now seniors are looking every case regarding to womens