मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या रोडावली असली तरीही त्याचा फायदा महाराष्ट्रातील लगतच्याच पेंच किंवा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळालेला नाही. मात्र, कान्हाच्या तुलनेत ताडोबातील पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ झाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांचा आलेख किंचित उंचावला आहे.
गेल्या काही वर्षांत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांचा आलेख चढता राहिला आहे. एक दुसरा पर्यटक वगळता या व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला वाघाने दर्शन दिले आहे. या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना खुणावेल असा निसर्ग नाही, तर जंगल सपाट आहे. मात्र, शिकाऱ्यांच्या जाळयात फसल्यानंतरही वाघांची संख्या वाढतीच राहिली आहे. जंगलसफारी म्हणजे व्याघ्रदर्शन असे समीकरण झाले असताना ताडोबातील वाघ विदेशी पर्यटकाला खुणावत आहे. भारताइतकेच भारताबाहेरील पर्यटकांचा ओढा मोठा आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी साधारण पर्यटकांना परवडणारी नसली तरीही कान्हाच्या तुलनेत ती नक्कीच परवडणारी आहे. कान्हामध्ये ज्या ठिकाणी सरकारी निवासस्थानात दोन हजार रुपये आकारले जातात, तिथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ९०० ते १५०० रुपयात काम होते. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचे मूळ कारण येथील ‘टायगर शो’ वर आलेली बंदी आहे. या बंदीमुळे व्याघ्रदर्शनाची हमी नसल्याने पर्यटक इकडे वळायला तयार नाही. एकेकाळी याच ‘टायगर शो’करिता दूरदूरवरुन पर्यटक कान्हात येत होता. याशिवाय एका फेरीसाठी जिप्सीला द्यावे लागणारे १८०० रुपये आणि दोन ट्रीप करायच्या झाल्यास २४०० रुपये पर्यटकांना मोजावे लागतात. एवढेच नव्हे तर रिसॉर्ट बुक करणारा पर्यटक सफारी सहजच होईल या भ्रमात असतो. मात्र, सफारीसाठीसुद्धा ऑनलाईन बुकिंग करावे लागते हे पर्यटकांना ठाऊक नसल्याने त्याला थांबावे लागते अथवा परतावे लागते. कान्हात एका दिवसाला तब्बल आठ ते दहा हजार रुपयाचा खर्च पर्यटकांना सोसावा लागतो, जो ताडोबाच्या तुलनेत अधिक आहे.
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या संख्येत पूर्वीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पश्चिम पेंचच्या तुलनेत पूर्व पेंचमध्ये वाघाचे दर्शन निश्चित आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक व राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांच्याशी संपर्क साधला असता, कान्हा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पर्याय उपलब्ध असता तर कदाचित इथला पर्यटक कमी झाला नसता, असे त्यांनी सांगितले. कान्हात तर ५० टक्के पर्यटक कमी झाला असेल तर त्यातील ४० टक्के पर्यटक हा मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात तर १० टक्के पर्यटक हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे वळला असल्याचे ते म्हणाले.