नाशिक ते मुंबई विमानसेवेचे त्रांगडे अजूनही सुटण्याच्या मार्गावर नसताना पाण्यावरील विमान सेवा म्हणजेच ‘सी प्लेन’ सेवा सुरू करण्यासाठी सुरू असलेला आटापीटा हा चेष्टेचा विषय होऊ लागला आहे. अलीकडेच सी प्लेन सेवेची चाचणी यशस्वी झाली असली तरी ही सेवा कायमस्वरूपी सुरू करण्याआधी काही मुद्दे मार्गी लावण्यात यावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभियंता गोविंद माळी यांनी व्यक्त केली आहे.

केवळ भव्यदिव्य इमारती बांधण्यात आल्या आहेत. परंतु त्यांचा काहीच उपयोग नाही, अशी स्थिती ओझर विमानतळ, बोट क्लब यांची झाली आहे. त्या पंक्तीत आता सी प्लेन सेवाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओझर विमानतळ इमारत, बोट क्लब यांचे उद्घाटन होऊन कित्येक महिने झाले. परंतु प्रत्यक्षात त्यांचा वापरच सुरू झालेला नसल्याने उद्घाटनाची इतकी घाई का करण्यात आली, असा प्रश्न कोणालाही पडावा. याआधीही ओझर ते मुंबई विमानसेवा नियमित स्वरूपात सुरू करण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु विमानसेवा सुरू झाल्यानंतर पुरेशा प्रवाशांअभावी काही दिवसांनी ती बंद पडत असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला आहे. यावेळी पुन्हा तोच कित्ता गिरवला जाऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. विमानसेवा धड सुरू होत नसताना पाण्यावरील विमान सेवेची चाचणी गंगापूर धरणात अलीकडेच घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाली. परंतु याचा अर्थ ही सेवा त्वरीत कायमस्वरूपी सुरू होईल, असाही नाही. याच विषयावर गोविंद माळी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सी प्लेन सेवा कायम होण्याआधी काही बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. सी प्लेन म्हणजे समुद्री-विमान. या विमानाचे उड्डाण किंवा अतवरण समुद्रात झाल्यास दुर्दैवाने ते भरकटले किंवा आपटले तरी समुद्राचे कोणतेही नुकसान होत नाही. परंतु धरण समुद्राच्या मानाने कणभर आहे. धरणाच्या जलाशयात असे काही झाल्यास त्याचा फटका धरणाला बसणार नाही कशावरून, असा प्रश्न माळी यांनी उपस्थित केला आहे. विशेषत: त्याचा इंधनासाठा धरणात पडू नये. उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यास ही सेवा खंडित होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान होऊन पुन्हा ही मंडळी नाशिकच्या नावे बोटे मोडण्यास मोकळी, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. धरणातील जलाशयाचे प्रचंड बाष्पीभवन वर्षभर होत असते. ही प्रकिया थांबविण्यासाठी काही उपाययोजना मांडण्यात येत आहेत. त्यात धरणाचे थंड पाणी पृष्टभागावर आणून पाण्याचे तापमान कमी करणे, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करणे, यासारख्या उपायांचा समावेश आहे. या उपायांमुळे धरणातून ४० ते ५० टक्के पाण्याचे नुकसान टळू शकेल. हेच पाणी पिण्यासाठी, शेतीला व उद्योगांना तसेच वीज निर्मितीसाठी जास्त दिवस पुरू शकेल. सी प्लेन सेवेचा या उपायांना अडथळा तर निर्माण होणार नाही ना, याचा विचार करणे आवश्यक आहे. धरणाच्या पाण्यावर विमानाने ये-जा करण्याची थरारक सोय करण्यापेक्षा लोकजीवनाच्या हितास प्राधान्य देणे अधिक महत्वाचे असल्याचा मुद्दाही माळी यांनी मांडला आहे. मुळात नाशिक-मुंबई रेल्वेसेवेच्या अनेक समस्या प्रलंबित असताना आणि विमानतळाचा केवळ सांगाडा उभा राहिला असून ती सेवाही अधांतरी असताना या सेवा योग्य तऱ्हेने कार्यान्वित होण्याकरीता प्रयत्न करण्याऐजवी सी प्लेन सेवेच्या मागे लागणे म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे असल्याची नाशिककरांची भावना झाली आहे. परिसरातील शेतकरी आणि निसर्गप्रेमींचा या सेवेस असलेला विरोधही लक्षात घ्यावा लागणार आहे. या सर्व कंगोऱ्यांमुळे सी प्लेन सेवा कधी नियमित होईल, याविषयीही त्रांगडेच आहे.