श्रीगोंदे व कर्जत तालुक्यात काही भागाला बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. गाराही मोठय़ा आकाराच्या होत्या. गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
श्रीगोंदे शहरासह तालुक्यातील मांडवगण फराटा, बेलवंडी, पेडगाव, आढळगाव, चांडगाव, पारगाव, तांदळी गावांमध्ये तसेच कर्जत तालुक्यातील माळेवाडी, बिटकेवाडी, रेहकुरी, वालवड, सुपा, चखालेवाडी, शिंदा, रपईगव्हण या गावांना गारपिटीने तडाखा दिला. कर्जत शहरात मात्र हलक्या पावसाने हजेरी लावली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक अकाशात काळे ढग जमा झाले. जोरादार वारा सुटला व काही मिनिटांतच गारांचा पाऊस सुरू झाला. सगळीकडे साधारणपणे अर्धा तास हा पाऊस सुरू होता.
शेतीत सध्या गहू व ज्वारी खुडून टाकण्यात आली आहे. गारपिटीमुळे ज्वारी व गहू भिजला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिजल्यामुळे हे धान्य आता काळे पडेल, त्याला बाजारभाव मिळणार नाही. पावसाने वैरणही खराब होण्याची भीती आहे. येत्या काही दिवसांत हे धान्य बाजारात विक्रीला गेले असते. मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडातील घास गेला आहे. आंब्याचा मोहोरही या गारपिटीने गळून पडला असून द्राक्षासह डाळिंबाचे, चिकू, केळीच्या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही. प्रांताधिकारी संदीप कोकडे व तहसीलदार पोपटराव कोल्हे यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.