कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मागील तीन-चार वर्षांत झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी काही नगरसेवक तसेच प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केल्याची चर्चा आहे. या बांधकामप्रकरणी महापालिका प्रशासनाने चार नगरसेवक तसेच तीन प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत येणे आवश्यक असला तरी राजकीय दबावापोटी तो दाबून ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.  कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मागील चार वर्षांत मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. बहुतांशी अनधिकृत बांधकामे काही नगरसेवक तसेच प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने उभी राहिल्याचे चित्र आहे. काही नगरसेवक, अधिकाऱ्यांचा या बांधकामांमध्ये सहभाग असल्याचेही यापूर्वी स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकरणांमधील कल्याण पूर्व भागातील दोन तर डोंबिवलीत दोन नगरसेवकांची पदे रद्द करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नस्ती तयार केल्या आहेत. मात्र, यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभागृहात मांडला जाणे आवश्यक आहे. कल्याण महापालिकेतील अधिकारी दरवर्षी लाचखोरीच्या प्रकरणात सापडत आहेत. यापैकी काही अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकामांना संरक्षण पुरविण्यासाठी लाच मागितल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महापालिकेच्या कामकाजावर बारीक लक्ष असल्याची चर्चा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कल्याण-डोंबिवली पालिकेतील आजी, माजी नगरसेवकांची चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.