उमेवारांच्या अनधिकृत प्रचारफलकांच्या कारणाने कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी आयुक्त शंकर भिसे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर इतर महापालिका अधिकाऱ्यांनी या अनधिकृत प्रचारफलकांचा मोठा धसका घेतला आहे. सोमवारी महापालिकेला सुट्टी असतानाही प्रमुख अधिकारी तसेच प्रभाग अधिकारी आपल्या कार्यालयांमध्ये उपस्थित होते. स्वत: प्रभागात फिरून अनधिकृत प्रचारफलक काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. 

महापालिकेच्या कल्याण परिसरातील पाच प्रभाग कार्यालयांच्या आवारात तसेच डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी प्रभागातून काढून आणलेल्या प्रचारफलकांचे ढीग लावण्यात आले आहेत. सुमारे दोन ते तीन हजार प्रचारफलक गेल्या दोन दिवसांत काढण्यात आले आहेत. प्रत्येक उमेदवाराचे अनधिकृत प्रचारफलक किती, त्याची मोजणी करून तो आकडा निवडणूक अधिकाऱ्यांना कळवण्यात येणार आहे.
महापालिकेचा प्रचारफलकासाठी असलेला १५ फूट दरावर निवडणूक अधिकारी पाच पटीने दंडात्मक कारवाई करून ती रक्कम संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात जमा करणार आहेत, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. प्रचारफलक काढताना राजकीय पक्षाचे उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांचे भांडण नको म्हणून सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत, संध्याकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत अनधिकृत फलक काढण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. दर एक तासाने महापालिकेचे टेम्पो ढीगभर प्रचारफलक घेऊन महापालिकेच्या आवारात येत असल्याचे दृश्य शहरात दिसत आहे. पालिकेच्या अ, ब, क, ड, ग आणि फ प्रभागांत ही कारवाई धडाक्यात सुरू आहे. डोंबिवली पश्चिमेत ‘ह’ प्रभागात प्रभारी प्रभाग अधिकारी कार्यरत असल्याने तो प्रभावीपणे काम करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे डोंबिवली पश्चिम भागात गल्लीबोळात मोठय़ा प्रमाणात उमेदवारांचे अनधिकृत प्रचार फलक विजेचे खांब, इमारती, नाल्यांचे कठडे, झाडांना लावलेले दिसत आहेत.
पालिकेच्या जनसंपर्क विभागाने मागील दोन दिवसांत सात प्रभागा क्षेत्रांमधून ६६९ अनधिकृत प्रचारफलक व ४१२ विविध राजकीय पक्षांचे झेंडे काढण्यात आल्याचे सांगितले.