मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त गंगापूर रस्त्यावर आयोजित केल्या जाणाऱ्या  मॅरेथॉनमुळे हा रस्ता यापुढे ‘मॅरेथॉन मार्ग’ म्हणून विकसित करण्यासाठी संस्थेने महापालिकेकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची विनंती केली आहे. जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधत नाशिककरांना सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यसााठी संस्थेच्या वतीने सोमवारी सकाळी ऑलिम्पियन कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ऑलिम्पिक डे रन’ झाला. या वेळी संस्थेच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘मॅरेथॉन’ शिल्पाचे अनावरणही करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी मॅरेथॉन मार्गासाठी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्याकडे प्रस्ताव ठेवला.
संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑलिम्पिक डे रन’ सोहळ्यास महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या रनमध्ये सहभाग घेतला. नियोजित वेळेनुसार अचूकपणे सकाळी सात वाजता रन सुरू झाली. त्यामुळे काही वेळाने उपस्थित झालेल्यांना रनमध्ये भाग घेता आला नाही. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात चौकापासून (मविप्र मॅरेथॉन चौक) सुरू झालेली रन व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या चौकास फेरी मारून पुन्हा थोरात चौकात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चौकात उभारण्यात आलेल्या ‘मॅरेथॉन’ शिल्पाचे अनावरण करण्यात आले. या वेळी संपूर्ण चौक विविध खेळाडूंच्या छायाचित्रांनी सजविण्यात आला होता.
यानंतर चौकात झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या सवरेत्कृष्ट खेळाडूंना तसेच रनसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात आले. खेळाडूंमध्ये राहुल हगवणे (धनुर्विद्या), दुर्गा देवरे, दत्ता बोरसे (धावपटू), स्वप्निल गीते (खो खो), अस्मिता दुधारे, जय शर्मा, स्नेहल विधाते (तलवारबाजी), राजश्री शिंदे, प्रशिक्षक राजेंद्र शिंदे (व्हॉलीबॉल), वैशाली तांबे (नौकानयन) यांचा समावेश आहे. मॅरेथॉन शिल्प तयार करणारे मानसिंग ढोमसे यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी मॅरेथॉन मार्ग विकसित करण्यासाठी या मार्गातील दुभाजकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अजून पाच मॅरेथॉन शिल्प उभारण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली. तसेच संस्थेच्या वतीने दरवर्षी २३ जून रोजी ‘ऑलिम्पिक डे रन’ चे आयोजन करण्यात येणार असून यापुढे त्याचे स्वरूप अधिक व्यापक व सर्वागसुंदर असेल, अशी ग्वाही दिली. महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी संस्थेच्या उपक्रमांचा गौरव करून संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेकडून क्रीडा विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असून पालिकेकडून लवकरच मांडण्यात येणारे क्रीडा धोरण हा त्याचाच एक भाग असल्याचे नमूद केले. संस्थेचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.