हिंदी चित्रपटसृष्टीत जे अभिनयासाठी ओळखले जातात अशा मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे ओम पुरी. अभिनयातला हा दादा माणूस आता पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळला आहे. शबाना आझमी आणि फारूख शेख यांच्या नितांतसुंदर वाचिक अभिनयामुळे गाजलेल्या ‘आपकी अमृता’ या नाटकाच्या पंजाबी भाषेत अनुवादित ‘तुम्हारी अमृता’ या नाटकातून ते पुनपदार्पण करणार आहेत. या नाटकात त्यांच्या जोडीला दिव्या दत्ता ही अभिनेत्री असून मुंबई, दिल्ली, पंजाबसह परदेशातही या नाटकाचे प्रयोग करण्याचा मानस असल्याचे ओम पुरी यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना स्पष्ट केले.
फाळणीआधी फुललेल्या पण फाळणीनंतर कोमेजलेल्या एका प्रेम कहाणीचे नाटय़रूप म्हणजे ‘आपकी अमृता’. हिंदू मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्यातील बालवयापासूनचे प्रेम कसे पूर्णत्वाला जात नाही. यात अखेर ती मुलगी आत्महत्या करते. या नाटकाला देशाच्या कानाकोपऱ्यातून दाद मिळाली होती. विविध भाषांमध्ये या नाटकाचे अनुवादही झाले होते.
या नाटकाच्या पंजाबी अनुवादात, ‘तुम्हारी अमृता’ या नाटकात ओम पुरी काम करणार आहेत. मी तब्बल २५ वर्षांनंतर रंगभूमीवर काम करत आहे. एवढय़ा वर्षांनंतर एखादी गोष्ट करताना मनात एक भीती असते. त्या भीतीपोटीच मी ‘तुम्हारी अमृता’चा विचार केल्याचे पुरी यांनी सांगितले. या नाटकात नेपथ्य नाही, प्रकाशयोजना आणि कपडेपटही नाही. त्यामुळे आपल्याला या नाटकात काम करणे थोडे सोपे होते, असे ते म्हणाले. शबाना आझमी आणि फारूख शेख यांनी सादर केलेले हे नाटक आपण अनेकदा पाहिले आहे. या नाटकाने आपल्यालाही भुरळ पडली होती, असेही त्यांनी नमूद केले.
या नाटकाची निर्मितीही ओम पुरी यांच्याच ‘ओम पुरी प्रॉडक्शन’ने केली आहे. या नाटकाचा मुंबईतील ६ तारखेचा प्रयोग झाल्यानंतर दिल्लीत सरकारनेच त्यांना चार प्रयोग करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आम्ही या नाटकाचे प्रयोग पंजाबमधील विविध शहरांमध्ये करणार आहोत. तसेच अनेक पंजाबी लोक परदेशात राहत असून तेथेही आपण हे नाटक घेऊन जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे चांगल्या भूमिका असलेले चित्रपट मिळत नसतील, तर आपण केवळ नाटकेच करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.