मुंबईतल्या कोणत्याही बस थांब्यावर बस थांबवण्यापूर्वी बेस्टच्या बसचालकांना खासगी वाहनांचे अडथळे पार करावे लागतात. परिणामी, बेस्टची बस थांब्यापासून थोडीशी पुढे किंवा मागे किंवा भर रस्त्यात थांबवली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांपर्यंत थेट बस नेण्यासाठी बेस्ट प्रशासन आता थांब्यांभोवती ‘पिवळी लक्ष्मणरेषा’ आखणार आहे. थांब्याच्या पुढे आणि मागे १५ मीटर अंतरावर ही रेषा असून त्या भागात खासगी वाहने उभी करण्यास मनाई असेल. याबाबतचा प्रस्ताव सध्या महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे.
बेस्टच्या थांब्यांच्या पुढे व मागे असलेली रस्त्यावरील १५ मीटरची जागा बेस्टच्या बससाठीच राखीव असते. या थांब्यांजवळ खासगी गाडय़ा उभ्या करू नयेत, असा वाहतूक पोलिसांचा नियमही आहे. मात्र हा नियम धाब्यावर बसवून मुंबईत अनेक ठिकाणी बस थांब्याला खेटून सर्रास अनेक गाडय़ा उभ्या केलेल्या आढळतात. या गाडय़ांमुळे बेस्ट बसच्या वाहतुकीत अनेकदा अडथळा निर्माण होतो. काही ठिकाणी तर रस्त्यावर थांबलेल्या बसपर्यंत पोहोचण्यासाठीही प्रवाशांना या खासगी गाडय़ांच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
या सर्व अडचणींतून मार्ग काढण्यासाठी आणि बेस्टला थांब्याच्या बाजूची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आता या थांब्यांभोवती १५ मीटर अंतरात पिवळे पट्टे आखण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आता महापालिकेकडे पाठविण्यात येणार आहे. या पिवळ्या पट्टय़ांमध्ये एकही खासगी गाडी उभी करू नये, अशा सूचनाही थांब्यांजवळ लावण्यात येतील. हे पिवळे पट्टे आखल्यानंतर थांब्यांभोवतीचा खासगी वाहनांचा विळखा मोकळा होऊन हे थांबे फक्त बसगाडय़ांसाठी उपलब्ध होतील, असे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
बस थांब्यांभोवतीचे हे पिवळे पट्टे महापालिका आखून देणार असून त्यासाठी खास प्रकारचा पिवळा रंग आवश्यक असतो. हा रंग काँक्रीट किंवा डांबर रस्त्यावर पक्का राहणे गरजेचे असते. गाडय़ांच्या वाहतुकीमुळे हा रंग निघणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार आता या पिवळ्या रंगाचा शोध सुरू असून त्यानंतर वाहतूक पोलिसांशी सल्लामसलत करून हे पट्टे आखण्यात येतील, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.