गायक, संगीतकार आणि गीतकार भूपेन हजारिका यांचा जीवनप्रवास लवकरच बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हजारिका यांच्या जीवनावर एका चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. हजारिका यांचे जीवन मोठय़ा पडद्यावर साकारणे ही एक कठीण जबाबदारी असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम सोनी यांनी सांगितले.
‘रुदाली’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या दिग्दर्शिका आणि हजारिका यांच्यासमवेत सुमारे चाळीस वर्षे राहिलेल्या कल्पना लाजमी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाच्या पटकथेवर सोनी यांच्यासह लाजमी याही काम करत आहेत.
या अगोदर अभिनेत्री व दिग्दर्शिकापूजा भट्ट हजारिका यांच्यावर चित्रपट तयार करणार होत्या. मात्र चित्रपटाला आर्थिक पाठबळ देणारी कोणी व्यक्ती मिळाली नाही तसेच आपण या चित्रपटाला न्याय देऊ शकणार नाही, असे सांगून भट्ट या चित्रपट तयार करण्याच्या निर्णयापासून मागे हटल्या होत्या.
चित्रपटात कल्पना लाजमी यांची भूमिका पूजा भट्ट तर भूपेन हजारिका यांच्या भूमिकेसाठी अजय देवगण, सैफ अली खान, रणबीर कपूर यांच्या नावाची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. कोणाचे नाव नक्की झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र असे असले तरी दिग्दर्शक सोनी यांनी चित्रपटाच्या पटकथेवर अभ्यास आणि काम करायला सुरुवात केली आहे.
कल्पना लाजमी चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाच्या भूमिकेत असून पटकथा तयार करण्यात त्यांचाही सहभाग आहे. त्यांच्या मदतीखेरीज आपण हा चित्रपट तयार करू शकत नाही, असे सोनी यांचे म्हणणे आहे. भूपेन हजारिका यांचा संपूर्ण जीवनप्रवास दोन ते अडीच तासांच्या चित्रपटात मांडणे हे खरोखरच एक आव्हान आहे. सगळे काही सुरळीत झाले तर या वर्षांच्या अखेरीस चित्रपटाच्या प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होईल, असा विश्वास प्रेम सोनी यांनी व्यक्त केला आहे.