कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात पुन्हा एकदा औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसापासून मलेरिया, जुलाब-उलटीचे रुग्ण वाढले आहेत. या रुग्णांना देण्यासाठी पालिकेत मुबलक औषधसाठा नसल्याने त्यांना बाहेरून औषधे लिहून द्यावी लागत आहेत. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होत आहेत, अशी माहिती काही रुग्णालय सूत्रांनी दिली.
रुग्णालयातील श्वानदंशाची इंजेक्शन्स संपली आहेत. त्यामुळे रुग्णांना बाहेरील औषधे विकत घ्यावी लागत आहेत. क्षय रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधांचाही तुटवडा भासू लागला आहे, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. जुलाब-उलटीच्या रु ग्णांना देण्यात येणारी किरकोळ औषधे संपल्याने डॉक्टर रुग्णांना बाहेरील औषध लिहून देत आहेत. यावेळी रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. कल्याणमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. स्थायी समितीने चार महिन्यापूर्वी सुमारे ६० ते ७० कोटी रुपये औषध खरेदीसाठी मंजूर केले आहेत. परंतु, ठेकेदार आणि काही पालिका अधिकारी यांच्यातील रस्सीखेचीमुळे रुग्णांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे, असे सूत्राने सांगितले.
यासंबंधी प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लवांगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीला गेले आहेत असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.