पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सरकारी नोकरी गेल्याचा राग मनात धरून एकाने कामोठे पोलीस ठाण्यातील उभी असलेली दुचाकी जाळण्याचा प्रकार केला. ही घटना शुक्रवारी सकाळी कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. या माथेफिरूच्या अटकेनंतर अजून पाच वाहने जाळणाऱ्याचा व एक दुचाकी चोरीचा शोध लागला आहे.
कामोठे पोलीस ठाण्यात सुरक्षेच्या दृष्टीने काही जण येथे आपली वाहने उभी करून निघून जातात. अशाच एका व्यक्तीने वाहन जाळल्याचे पोलिसांना आढळून आले. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर हे वाहन कसे जळाले याचा शोध येथील सीसीटीव्हीच्या फूटेजवरून घेतला असता माथेफिरूचे नाव अमोल सयाजी बाबर (वय ३२) असे असल्याचे आढळून आले. अमोल याला कामोठे येथून काही तासांच्या आत पोलिसांनी पकडले. अमोलच्या अटकेमुळे इतर गुन्ह्य़ांचा शोध लागण्यास मदत झाली, अशी माहिती  शोध वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी दिली. अमोल हा मुंबई महानगरपालिकेचा चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी होता. त्याच्यावर २०१० रोजी कळंबोली येथे वाहन जाळल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे त्याने पोलिसांवर सूड उगविण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. कामोठे पोलीस ठाण्यात २२ मार्च रोजी सेक्टर ३५ येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तीन दुचाकी जळाल्याच्या व तीन दिवसांपूर्वी जुई आर्केड या इमारतीमधील एक रिक्षा व एक दुचाकी जळाल्याबाबत पोलीस ठाण्यात नोंद आहे. याचा तपास पोलीस हवालदार मुळीक व पोलीस उपनिरीक्षक लहाने करीत होते. आज सकाळी पोलीस हवालदार मुळीक यांनी अमोल याला भेटण्यासाठी ठाण्यात बोलावले होते. अमोल याला मुळीक भेटले नाहीत, परंतु अमोलने पोलिसांच्या प्रती राग व्यक्त करण्यासाठी त्यांच्या मुद्देमालात उभी केलेली हिरो-होंडा कंपनीची दुचाकी जाळली. अमोल हा दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीचा पाइप काढून त्याला आगपेटीने आग लावायचा अशी त्याची दुचाकी जाळण्याची पद्धत होती. अमोलने पोलिसांना कामोठे येथून दुचाकी चोरून त्याच्या मूळगावी कराड येथील एका धाब्यावर उभी केल्याची कबुली दिली. दरम्यान जाळलेल्या दुचाकीचा मालक कोण अद्याप कळू शकले नाही. त्यासाठी संबंधित दुचाकीच्या क्रमांकावरून प्रादेशिक परिवहन विभागाकडे पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे.
पोलिस ठाण्यात बेकायदा पार्किंग
कामोठे पोलीस ठाण्यात नो पार्किंगचे फलक लावले असतानाही पोलिसांची परवानगी न घेता पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकी लावण्यात येत आहेत. जाळण्यात आलेले वाहनही बेकायदा पार्किंग करण्यात आले होते. चालकाविरोधात वाहन अधिनियम कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकारी मुल्लेमवार यांनी सांगितले.