दिवा भागातील एका इमारतीच्या गच्चीवरील ड्रेनेज डगमध्ये पडून एका चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
साधना विनोद गौंड, असे यातील बालिकेचे नाव असून ती दिवा भागातील मातोश्री कॉम्पलेक्समध्ये राहात होती. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गच्ची असून तिला संरक्षक भिंत नाही. तसेच ड्रेनेज डगवर संरक्षक जाळी किंवा झाकणही नाही. २२ नोव्हेंबरला इमारतीच्या गच्चीवर खेळत असताना ड्रेनेज डगमध्ये पडून साधनाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने साधनाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक उत्तम सावंत यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.