कवितेतील प्रतीके, देहबोली, लय आदी माध्यमातून ‘कविता का रंगमंच’ हा वेगळा प्रयोग मोठय़ा ताकदीने सादर करताना संजय लकडे यांनी नाटय़क्षेत्रात चांगला लौकिक प्राप्त केल्यानंतर नव्या उमेदीसह वेगळा प्रवास सुरू केला. कवितेचा आशय रंगमंचावर उलगडून दाखविण्याचे आव्हानात्मक कार्य करून अनेकांची वाहवाही त्यांनी मिळविली. प्रवाहापेक्षा वेगळे आणि विलक्षण करण्याच्या प्रयत्नांमुळे लकडे यांचे नाव नेहमीच प्रकाशात राहात आले आहे..
येथील जे. ई. एस. महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात अध्यापन करणारे संजय लकडे हे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राशी जवळीक असणारे व्यक्तिमत्त्व. नाटय़क्षेत्रात वेगळा मार्ग अवलंबणारे कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. राजकमल चौधरी यांच्या दीर्घ कवितेवर आधारित ‘मुक्तिप्रसंग’ हा एकपात्री प्रयोग त्यांनी अलीकडेच सुरू केला. इंडियन सोसायटी फॉर थिएटर रीसर्च या  संस्थेच्या आमंत्रणावरून त्यांनी राजस्थान केंद्रीय विद्यापीठ व जयपूर विद्यापीठात ‘मुक्तिसंग्राम’चे प्रयोग केले. तेथे या प्रयोगाच्या सादरीकरणावर चर्चासत्रही झाले. काही दिवसांपूर्वीच लकडे यांचा वर्धा हिंदी विद्यापीठाने हिंदी सेवी सन्मान पुरस्काराने गौरव केला.
औरंगाबादला विद्यार्थी दशेतच लकडे हे परिवर्तनवादी संघटना, चळवळींकडे आकर्षित झाले. या दरम्यान नाटक, साहित्यविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढला. ‘आंतरभारती’ च्या माध्यमातून चंबळ खोऱ्यातील शिबिरातही त्यांनी भाग घेतला. कबड्डीसारख्या खेळातही प्रावीण्य मिळविले. औरंगपुऱ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत बेभान होऊन नाचताना लकडे यांना त्यांच्याच एका महाविद्यालयीन मित्राने बघितले आणि लेखक शरद जोशी यांच्या हिंदी एकांकिकेत काम करण्याचे आमंत्रण दिले. तेथून पुढे लकडे यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला, तो आजच्या ‘मुक्तिप्रसंग’च्या एकपात्री प्रयोगापर्यंत.
मराठी नाटकात त्यांनी खऱ्या अर्थाने पहिली भूमिका वठविली, ती ‘काळोख देत हुंकार’ मधील मुकादमाची. नेहरू युवा केंद्रातर्फे सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत दक्षिण भारताचा दौरा करून कोळी लोकनृत्य, वाघ्या-मुरळी आदींचे सादरीकरण अन्य कलाकारांना सोबत घेऊन केले. या उत्साही वातावरणातच नाटय़शास्त्र विभागातील एका विद्यार्थ्यांच्या सूचनेवरून ज्ञानदेव अग्निहोत्री यांच्या ‘शुतुरमुर्ग’ या हिंदी नाटकात लकडे यांनी राजाची भूमिका साकारली. या नाटकाची तालीम पाहण्यास आलेले औरंगाबादचे प्रसिद्ध नाटककार त्र्यंबक महाजन यांना लकडे यांचे काम आवडले आणि त्यांनी दलित थिएटर्सच्या ‘थांबा रामराज्य येतेय’ या नाटकात संधी दिली. या नाटकाच्या दिल्लीत झालेल्या प्रयोगाच्या वेळी लकडे यांची नाटय़ दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्याशी भेट झाली व त्यांचा उत्साह दुणावला. दिल्लीहून परतल्यावर ‘शुतुरमुर्ग’ व ‘थांबा रामराज्य येतेय’ या दोन्ही नाटकांत एकाच दिवशी सलग भूमिकाही त्यांनी साकारल्या.
एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २५ वर्षांपूर्वी जालना येथे नोकरीनिमित्त वास्तव्य सुरू झाल्यावर सुदामा पांडे ऊर्फ धुमिल यांचे ‘संसद से सडक तक’ पुस्तक हाती पडले. यातील ‘पटकथा’ या दीर्घ कवितेमुळे ते भारावले. ‘पटकथा’ चे प्रयोग सादर करण्याची कल्पना सुचली नि ती प्रत्यक्षात आणली. लकडे यांना ‘पटकथा’ सादरीकरणाची बीजे ‘व्यवस्थेच्या बैलाला’ या कवितांच्या सादरीकरणात जाणवली होती. ‘पटकथा’ च्या एकपात्री सादरीकरणास राज्यात व बाहेरही चांगला प्रतिसाद मिळाला. हिंदी साहित्य अकादमी (दिल्ली), इप्टा नाटय़महोत्सव, गणदृष्टी नाटय़महोत्सव (कोलकाता), मराठी सत्यशोधक साहित्य संमेलन, तसेच उदयपूर, जोधपूर, हैदराबाद, पुणे, तसेच केरळ, गुजरात राज्यात ‘पटकथा’चे प्रयोग झाले. तेथे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याच काळात दया पवार, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, भुजंग मेश्राम यांच्या कवितांचे सादरीकरणही लकडे यांनी केले.
‘पटकथा’ चे प्रयोग थांबविल्यानंतर दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर त्यांनी राजकमल चौधरी यांच्या ‘मुक्तिसंग्राम’ चे एकपात्री सादरीकरण सुरू केले आहे. याचे आतापर्यंत ५ प्रयोग झाले. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.