पंचतारांकित हॉटेल्समध्ये आत शिरल्यावर दिसणारे झगमगते वातावरण डोळे दिपवून टाकतं. पण अशाच एखाद्या हॉटेलमध्ये पर्यावरणाचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करून पर्यावरण उपयोगी प्रयोग करण्यात येऊ शकतात, ही कल्पना सर्वसामान्यांच्या मनाला शिवत नाही. पण यंदाच्या ‘जागतिक वसुंधरा दिना’चे निमित्त साधत मुंबईतील ऑर्किड या पंचतारांकित हॉटेलमध्ये जमा होणाऱ्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून एक हजार फुटांची भिंत रंगवण्यात आली. विशेष म्हणजे हे काम हॉटेलमधीलच विविध विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या वेळा पाळून केले आहे.
आपल्या ऑर्किड हॉटेलमध्ये ही संकल्पना दरवर्षी प्रत्यक्षातही उतरवत असतात. यंदाच्या वसुंधरा दिनाच्या दिवशी काही तरी वेगळे करायचे, यादृष्टीने विचार करताना त्यांना त्यांच्या हॉटेलची एक हजार फूट लांब उदासीन पडलेली भिंत डोळ्यासमोर आली. एरवी या भिंतीवर रंगरंगोटी करून प्रश्न मिटविणे शक्य होते, पण त्यांनी मात्र ही भिंत हॉटेलमधील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना विभागून दिली. कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करत, स्प्रे पेंटिंग, विभागातील टाकाऊ वस्तू यांचा वापर करत, भिंतीला नावीन्यपूर्वक सजविले. या प्रयोगामुळे अशा प्रकारचा प्रयोग केलेली ही भारतातील सर्वात जास्त लांबीची भिंत असल्याचे विठ्ठल कामत यांनी नमूद केले.
त्यामुळे या भिंतीजवळून फिरताना कुठे तरी स्वयंपाकघरातील प्लॅस्टिकच्या किटली, बिघडलेले एसी आणि सीपीयू, टायरमध्ये फुललेली रोपटी, बल्बचा वापर करून रेंगणारे किडे, टायर आणि रबरमधून साकारलेला कोंबडा, रिकाम्या बाटल्यांमधून तयार झालेली पक्ष्यांची घरे, बाटल्यांच्या झाकणांची झाडं अशा विविध कलाकृती पहायला मिळतात. विशेष म्हणजे हे सर्व करताना हॉटेलमधील शेफ, तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशिअन्स यांच्यामध्ये दडलेले कलाकार लोकांसमोर येतील याकडे जातीने लक्ष दिले. हा प्रयोग करताना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचेही कामत यांनी नमूद केले.