एकदा ‘प्रगतीची पावले’ पडायला लागली की ती सर्व दिशांना पडायला लागतात..
मराठी चित्रपटसृष्टीत त्याचा बऱ्याच बाबतीत प्रत्यय येत आहे, त्याचाच एक भाग म्हणजे, मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दूरदूरवरच्या गावात- खेडय़ात फड रंगू लागलेत. त्यामुळेही मराठी चित्रपटाच्या पडद्यावर नवीन स्थळे, ग्रामीण सौंदर्यस्थळे याचेही दर्शन घडू लागले आहे.
या ‘सुखद बदला’ची सुरुवातदेखील ‘श्वास’ (२००३) या चित्रपटापासून सुरू झाल्याचे श्रेय द्यायला हवे. ‘श्वास’पूर्वी कोकणात क्वचितच एखाद्या ‘करायचं ते दणक्यात’ अथवा ‘धमाल बाबल्या गणप्याची’ अशा चित्रपटाचे चित्रीकरण होई. गोव्यात तर एखाद्या ‘ठणठणगोपाळ’, ‘गुपचूप गुपचूप’ अशा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निर्माते जात. त्यापेक्षा बराच काळ सांगली, सातारा, कोल्हापूर येथेच चित्रीकरणाला पसंती दिली जाई. विशेषत: कोल्हापूरच्या अत्यंत गुणी व मेहनती अशा तंत्रज्ञ व कामगारांचे मराठी चित्रपटाच्या निर्मितीला भरपूर सहकार्य मिळे. दुपारची जेवणाची वेळ झाली तरी कोल्हापूरचे कामगार विनातक्रार लांबलेल्या चित्रीकरणात सहभागी होत..
‘श्वास’पासून मराठी चित्रपट निर्मितीच्या चित्रीकरणाचे प्रमाण वाढताना नवीन पिढीच्या निर्माते, दिग्दर्शक, छायादिग्दर्शक व कलादिग्र्दशक या ‘चौकडी’ची इतरत्र नजर पडू लागली. एकीकडे अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल, रेवदंडय़ाचा समुद्रकिनारा या परिसरात मोठय़ा प्रमाणावर चित्रीकरण होऊ लागले. ‘येडा’, ‘प्रेमाची गोष्ट’ इत्यादींचे येथेच चित्रीकरण रंगले, ‘अशाच एका बेटावर’चे रेवदंडापासून जवळ असणाऱ्या काशिद समुद्रकिनाऱ्यालगत चित्रीकरण झाले. या पट्टय़ात काही तगडय़ा निर्मात्यांचे असणारे बंगले व रिसॉर्ट्स चित्रीकरण अथवा कलाकारांना राहण्यासाठी उपयोगी पडू लागले. बरेचसे कलाकार या परिसरात चित्रीकरण असताना नागावच्या एखाद्या प्रशस्त बंगल्यात राहण्याला पसंती देतात. मुंबईपासून ही गावे जवळ असल्याने काही कलाकार ये-जादेखील करतात. काही वेळा त्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा अशा जल वाहतुकीने प्रवास करतात. फार पूर्वी अलिबाग परिसरातील चौल येथे ‘यशोदा’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले. अन्यथा या भागातील तेव्हाचे धूळ उडवणारे रस्ते मराठी चित्रपटसृष्टीला पसंत नसत. अलीकडे ठाण्याच्या येऊरपासून अमरावतीतील एखाद्या गावापर्यंत आणि उरणपासून नागपूरच्या बाहेरच्या भागात अक्षरश: कुठेही चित्रीकरणासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मग त्यासाठी जळगावचा कडक उन्हाळा असो अथवा रत्नागिरीतील पाऊस असो, हे सगळे गृहीत धरूनच मोठय़ा प्रमाणावर मराठी चित्रपटाचे सगळीकडे चित्रीकरण होऊ लागलेय. त्यामुळे ‘आपला महाराष्ट्र’ कसा मोठा आहे, याचेही ज्ञान मिळतंय.
या सगळ्यामागे काही ठळक कारणे दिसतात. ती अशी..
१) दूरदूरवरच्या निर्मात्यांचे मराठी चित्रपटसृष्टीतले आगमन, विशेषत: विदर्भ, मराठवाडा येथील अनेकांनी ‘निर्माता’ म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांना आपल्या चित्रपटाचे आपल्या ‘तालुक्याच्या अथवा गावाच्या ठिकाणी’ चित्रीकरण करणे हौसेचे अथवा प्रतिष्ठेचे वाटते, हा मनुष्य-स्वभाव झाला.
२) कथा-पटकथेची गरज- काही मराठी चित्रपट ग्रामीण कथेवरचे आहेत, त्यांना साहजिकच ‘गावाचा सेट लावण्या’पेक्षा प्रत्यक्ष एखाद्या गावात जाऊन चित्रीकरण करणे योग्य वाटते. तेजस्विनी पंडितची भूमिका असणाऱ्या ‘मुक्ती’ चित्रपटाचे असेच सातारा शहरापासून दोन तासांच्या अंतरावर असणाऱ्या अगदी छोटय़ाशा गावात चित्रीकरण झाले. आता छोटे कॅमेरेही वापरता येतात.
३) रहदारीच्या वाढत्या सुविधा- फार पूर्वी राष्ट्रीय महामार्ग वगळता इतरत्रचे रस्ते म्हणजे खड्डे, कच्चे काम व प्रचंड धुरळा असे समीकरण होते, पण आता परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. विशेषत: मुंबई-पुणे द्रुतजलदगती मार्गाचा मराठी चित्रपटसृष्टीलाही भरपूर फायदा झाला. विशेषत: पुणे शहरातील अनेक कलाकार मुंबईला सहज जोडले गेले, याच मार्गाने नगरपासून साताऱ्यापर्यंत अशा भिन्न मार्गावरील गावांत चित्रीकरणाला जाणे सोपे झाले आहे. बरेचसे मराठी कलाकार एक तर अवघ्या सहा महिन्यांत चकाचक नवी गाडी घेतात, तर काही जण वडिलोपार्जित गाडी घेऊनच चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात. स्वत:च्या गाडीने ‘गावाकडच्या रस्त्या’ला लागणे त्यांना आवडते. नवे रस्ते गाडीलाही आवडत असावेत.
४) राहण्याची सुखद सुविधा- फार पूर्वी कोल्हापूरमधील लक्ष्मी पुरीतील एका विशिष्ट हॉटेलमध्ये मराठी कलाकार मुक्काम करत, दोन कलाकार एकाच खोलीत राहण्यास तयार असत. अगदी दोन मराठी तारकाही चित्रीकरण काळात सुखाने नांदत. आता परिस्थितीत प्रचंड फरक पडला आहे. एक तर रिसोर्टस्मध्ये राहणे वाढलंय व तालुक्याच्या ठिकाणी उत्तम दर्जाची निवासस्थाने उपलब्ध आहेत. काही कलाकार म्हणे, ‘भूमिका कशी आहे’ यापेक्षा ‘तेथे राहण्याची व्यवस्था कशी आहे’ याची खात्री करून घेतात. चांगल्या राहणीमानाचा अभिनयावर चांगलाच परिणाम होतो यावर त्यांचा विश्वास असावा.