डोंबिवली पूर्व येथील कोपर उड्डाण पुलाजवळ होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी टंडन रस्ता येथे एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी ठाणे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्याकडे करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतून पश्चिमेला जाण्यासाठी टंडन रस्ता, कोपर उड्डाण पूल हा एकमेव मार्ग आहे.
मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची भेट घेऊन पूर्व भागातील कोणत्या रस्त्यांवर एकेरी, दुहेरी वाहतूक सुरू ठेवली तर वाहतूक कोंडी कमी होईल याचे सादरीकरण केले.

असे आहे सादरीकरण
* आगामी काळात राजाजी पथ भागात उन्नत रिक्षा वाहनतळ सुरू होणार आहे. त्या दृष्टीने या सुधारित वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात येत आहे. चार रस्ता, सुनीलनगर, नांदिवली भागातून येणारी वाहने उजव्या हाताने शिवमंदिर रस्त्याने, रामनगर बालभवनवरून डावीकडे वळण घेऊन टंडन रस्त्याकडे जातील. तेथून उजवे वळण घेऊन ती कोपर उड्डाण पुलाने डोंबिवली पश्चिमेत जातील.
* या एकेरी वाहतुकीमुळे टंडन रस्ता, दत्तनगर चौक, ठाकूर सभागृह या परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही. पश्चिमेकडून येणारी वाहने केळकर रस्ता किंवा टंडन रस्ता, दत्तनगर चौक या एकेरी रस्त्याने पुढे निघून जातील.
*  शिवमंदिर रस्ता, राजेंद्र प्रसाद रस्ता, दत्तनगर चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे टंडन रस्त्यावर कोपर उड्डाण पूल भागात वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी शिवमंदिर रस्ता कोपर पुलाकडे येणाऱ्या वाहनांसाठी, टंडन रस्ता दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीसाठी खुला ठेवला तर कोपर उड्डाण पूल भागात होणारी वाहतूक कोंडी टळेल.
* राजाजी पथ भागातील गल्ली क्रमांक एक फक्त येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीसाठी खुली असेल. राजाजी रस्त्यावरून शीळफाटा, पश्चिमेकडे जाणारी वाहने राजाजी गल्ली क्रमांक दोनवरून पाटकर शाळा रस्त्यावरून एस. के. पाटील शाळेवरून नियोजित स्थळी निघून जातील. हा प्रस्ताव पोलिसांनी मान्य केला तर सध्या डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाला वाहतुकीचा पडलेला वेढा सुटण्यास मदत होईल.