खोपटा खाडीवर दोन पुलांची उभारणी करण्यात आलेली आहे. यामुळे पुलावरील वाहतूक सुरळीत होण्याऐवजी दोन्ही पुलांवरून विरुद्ध दिशेने वाहतूक होत आहे. बुधवारी या बेकायदा वाहतुकीमुळे दोन मोटरसायकल चालकांचा अपघात झाला होता. त्याची दखल घेत सिडको तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही पुलांदरम्यान विरुद्ध दिशेने होणारी बेकायदा वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अपघातानंतर उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, सिडको, वाहतूक पोलीस आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत स्वत: खोपटा पुलाची पाहणी केली होती. या वेळी खोपटा येथील दोन्ही पुलांदरम्यान असलेल्या जागी बेट तयार करून दुहेरी मार्गातून एका पुलावरून दुसऱ्या पुलावर विरुद्ध दिशेने जाणारे मार्ग बंद करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार दोन्ही पुलांच्या द्रोणागिरी परिसरातील रस्त्यावर सिडको तर खोपटे गावच्या दिशेला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बेट तयार करून एकदिशा मार्ग तयार करण्यात येणार आहे, अशी  माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता ए. राजन यांनी दिली आहे.  सध्या तात्पुर्त्यां स्वरूपात वाहतूक विभागाने अडथळे लावून खोपटा पुलावरून एकदिशा मार्ग सुरू केले आहेत.