प्रलंबित कांदा चाळ अनुदान मिळण्यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आत्मा कार्यालयाचे संचालक सुभाष नागरे यांना निवेदन देत जाब विचारण्यात आला.
अनेक वर्षांपासून कांदा चाळीचे अनुदान प्रलंबित असून या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दोन महिन्यापूर्वी कांदा भाकरी आंदोलन करत आत्माचे संचालक नागरे यांना घेराव घालण्यात आला होता. त्यावेळी दोन महिन्यात अनुदान वाटप केले जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र हा कालावधी उलटूनही अनुदान दिले नसल्याने संतापलेल्या कांदा उत्पादकांनी शेकापचे दीपक पगार व हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली आत्मा कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. यावेळी स्वाभिमानीचे पदाधिकारी व नागरे यांच्या शाब्दिक चकमकी झाल्या. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे पाठपुरावा करून चार कोटी अनुदान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे. मात्र उर्वरित अनुदान महिन्याभरात शासन स्तरावरून आल्यानंतर त्याचे वितरण केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, महिनाभरात अनुदान प्राप्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शशिकांत कौर, पंढरीनाथ अहिरे, देवमन अहिरे आदी उपस्थित होते.