भविष्यात कांद्याच्या भाववाढीमुळे डोळ्यात पाणी आणण्याची वेळ येऊ नये म्हणून या वर्षी गृहिणींनी एप्रिल-मे महिन्यांत घरगुती साठवणीसाठी मोठय़ा प्रमाणात कांदा घाऊक बाजारातून खरेदी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे ९० ट्रक कांदा मुंबई, ठाणे, महामुंबई परिसरातील गृहिणींनी खरेदी केला आहे. हा कांदा त्यांना १५ ते २० रुपये प्रति किलो पडला आहे. त्यामुळे घराच्या कोपऱ्यात, बाल्कनीत हवा खात असलेल्या घरात निदान कांद्याच्या भाववाढीची झळ बसणार नाही असे दिसून येते.
जानेवारीनंतर नाशिक, पुण्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे शहरी तसेच काही ग्रामीण भागांत कांद्याने पस्तिशी गाठल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले असून सध्या चाळीमध्ये सुखरूप असलेला कांदा बाजारात पाठविला जात आहे. त्याचे प्रमाण कमी होत असून बुधवारी ११० ट्रक भरून कांदा घाऊक बाजारात आल्याची नोंद आहे. ही आवक सर्वसाधारण १५० ट्रक असते. कांद्यामुळे वांदा होऊ नये यासाठी काही गृहिणी कांद्याची घाऊक खरेदी करून तो घरातील एखाद्या कोपऱ्यात खुला करून ठेवत असल्याचे दिसून येते. उरण, पनवेल तसेच नवी मुंबई या भागातील ग्रामीण भागात कांदा उघडय़ावर ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याने अनेक गृहिणींनी ५० ते १०० किलो कांदा एप्रिल-मे महिन्यांत घरी नेल्याची महिती कांदा व्यापारी अशोक वाळुंज यांनी दिली.
या दोन महिन्यांत कांदा बाजारात दररोज शेकडो महिला कांदा खरेदी करीत होत्या. माथाडी आणि काही गृहिणी या कांद्याला घराच्या बाल्कनीत जागा करून देतात. सरासरी ४०० ते ५०० गृहिणी हा कांदा घेऊन घरी गेल्याने ही विक्री ९० ते १०० ट्रक झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. केंद्र सरकारने जानेवारीत कांद्याचा समावेश जीवनावश्यक पदार्थामध्ये केल्याने कांदा साठवणीला बंदी घालण्यात आली आहे. घाऊक बाजारात जागा कमी असल्याने अशी साठेबाजी होण्याची प्रश्न येत नाही पण काही व्यापारी नाशिक पुण्यात कांद्याच्या चाळी विकत घेत असल्याने अशी साठवणूक केली जात असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना या चाळी बांधण्यास सरकार सबसिडी देत असल्याने शेतकऱ्यांनीच अशा चाळी बांधल्या असून शेतकरी ग्राहकांसाठीच कांद्याची साठवणूक करून ठेवत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या या चाळ साठवणुकीबरोबरच आता ग्राहकही छोटय़ा प्रमाणात भविष्यासाठी घरगुती साठवणूक करीत असल्याचे आढळून आले आहे.