ऑनलाईन दिवाळी अंकांचे पालटतेय रूप
बोटांवर मोजण्याइतकया वर्षांचा इतिहास असलेल्या ऑनलाईन दिवाळी अंकांनी सीमांचे बंधन नसलेला मराठी वाचक कमाविण्याबरोबरच नावीन्यपूर्ण प्रयोगांचा वापर करीत स्वतंत्र स्थान निर्माण करणे सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने दिवाळी अंक उपलब्ध करण्यापासून ते दृक-श्राव्य प्रकारात साहित्य उपलब्ध करून देण्यापर्यंतचे नानाविध प्रयोग ऑनलाईन दिवाळी अंकांकडून होत असून रसिकांची पसंती मिळवू लागले आहेत.
गेल्या ४ ते ५ वर्षांपासून ऑनलाईन दिवाळी अंक मराठी वाचकांकरिता उपलब्ध होत असून दिवसाचे अनेक तास इंटरनेट हाताळणाऱ्या पिढीचा त्यांना प्रतिसादही मिळू लागला आहे. कार्यालयांमध्ये इंटरनेट उपलब्ध असणारा तसेच भारतातील व भारताबाहेरील मोठा मराठी वर्ग ऑनलाईन दिवाळी अंकांचा वाचक आहे. यावर्षी पहिल्यांदाच ब्लॉग स्वरूपात प्रकाशित झालेल्या डिजीटल दिवाळी अंकाला इंग्लंड व अमेरिके व्यतिरिक्त जर्मनी, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, बहारीन येथे असणाऱ्या मराठी वाचकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. ब्लॉग स्वरूपात असणा-या या अंकाला २०,००० च्यावर वाचकांनी भेट दिली आहे, असे या अंकांच्या संपादक सायली राजाध्यक्ष यांनी सांगितले. अर्थात, ऑनलाईन अंकांचा खरा वाचकवर्ग ठरवणे कठीण असले तरी त्याबाबतचा साधारण अंदाज निश्चितपणे बांधता येतो.
इंटरनेटमुळे आता या दिवाळी अंकांत अनेक प्रयोग होत असून अधिकाधिक वाचक जोडण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रकाशित होत असलेल्या व वाचकांची पसंती मिळवलेल्या ‘ऐसी अक्षरे’ चा अंक या वर्षी दोन टप्प्यांत प्रसिद्ध केला गेला. दिवाळीच्या एक आठवडय़ापूर्वी या अंकाचा पहिला भाग तर दिवाळीच्या दिवशी पूर्ण भाग प्रसिद्ध करण्यात आला. या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे ‘ऐसी अक्षरे’ च्या मेघना भुस्कुटे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. याशिवाय, ‘मायबोली’ने कथा ऐकण्याची व चित्रफिती बघण्याची सोयही करून दिली आहे. हा प्रयोग उत्तम असून विशेषत: नामवंतांच्या मुलाखती वाचकांना दृक-श्राव्य स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. संगणकाच्या स्क्रीनवर बघता येत असल्याने हे अंक अधिक प्रेक्षणीय ठरत असून त्याबाबतही नवे प्रयोग होऊ लागले आहेत.
प्रामुख्याने इंटरनेटशी जवळीक असणारा तरुण वर्ग या अंकांचा वाचक असला तरी अंक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घेण्याची सोय असल्याने वयाने जास्त असणाऱ्या व्यक्तीदेखील सवडीनुसार अंकाचे वाचन करू शकतात. फेसबुकसारख्या माध्यमांमुळे येणाऱ्या काळात ऑनलाईन दिवाळी अंकांना मिळणारा प्रतिसाद कसा असेल हे सांगणे कठीण असले तरी दर्जा व सातत्य टिकून राहिल्यास पारंपरिक दिवाळी अंकांच्या बरोबरीने चोखंदळ वाचकांना ऑनलाईन अंकाचादेखील पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
ऑनलाईन दिवाळी अंकांमुळे नवीन लेखक वर्ग तयार होण्यास मदत झाली आहे. हौशी लेखकांचे प्रमाण यात जास्त असले तरी विविध पाश्र्वभूमी असलेल्या लेखकांचे अनुभव यामुळे शब्दबद्ध होत आहेत. नव्या लेखकांबरोबरच जुने लेखकही ऑनलाईन लिहू लागले असून स्वतंत्र संपादक मंडळ काम करू लागले आहे. लेखनाचे संपादन व मुद्रितशोधन यावर मेहनत घेतली जात आहे. या सगळयामुळे सुरुवातीचे हौशी स्वरूप जाऊन अंकांमध्ये अधिक गांभीर्य येऊ लागले आहे.