महावितरणच्या ऑनलाईन वीज भरणा सुविधेला जिल्ह्य़ात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑन लाईन सुविधेने वीज बील भरणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ७५,२७४ ग्राहकांनी वाढ झाली आहे.
कमी त्रासात व विनाविलंब बील भरण्याचा पर्याय ऑन लाईन बिलींग सुविधेमार्फत ग्राहकांना महावितरणने उपलब्ध करून दिल्यावर या सुविधेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत नाशिक जिल्ह्य़ातील एकूण ३, ८१, ४२५ ग्राहकांनी ऑनलाईन वीज देयक भरणा सुविधेचा फायदा घेत ५९.०२ कोटींचा महसूल महावितरणला प्राप्त झाला. जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत ३०६,१५१ ग्राहकांनी ऑनलाईन देयकांच्या माध्यमातून एकूण ४१.३२ कोटी महसूल महावितरणला प्राप्त झाला होता. नाशिक जिल्ह्यात या वर्षी ऑन लाईन वीज देयक भरणा सुविधेचा फायदा घेणाऱ्या एकूण ३, ८१, ४२५ ग्राहकांपैकी ३, २५, ०७४ ग्राहक नाशिक शहर विभागातील तर उर्वरित ५६,३५१ ग्राहक ग्रामीण भागातील असून यापोटी अनुक्रमे ४४.७३ व १४.२८ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
महावितरणने संकेतस्थळावर ऑन लाईन वीज बील भरणा करण्याची सुविधा दिली आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्यावर ‘कन्झुमर सव्‍‌र्हिसेस’ या भागात जाऊन ‘पे बील’ पर्यायावर ‘क्लिक’ करून वीज देयकावर नमूद असलेला १० अंकी ग्राहक क्रमांक व ४ अंकी बिलिंग युनिट क्रमांक टाकून ऑनलाईन पद्धतीने ग्राहक वीज बिलाचा भरणा करू शकतात. सर्व लघुदाब ग्राहकांना क्रेडीट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून किंवा ‘नेट बँकींग’द्वारे वीज बिलाचा भरणा करण्याची सुविधा आहे. शिवाय या सुविधेचा फायदा घेण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. देयक भरण्याच्या अंतिम तारखेच्या आत वीज देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतो. रांगेत तासंनतास ताटकळत बसण्यापेक्षा विनाकटकट सोईस्कररित्या वीज देयकांचा भरणा होत असल्याने ग्राहकांनी ऑनलाईन सुविधेला भरभरून प्रोत्साहन दिले आहे. पुढील काळातही ग्राहकांनी असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.