राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासासाठी इंटरनेटद्वारे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठविण्यास सुरूवात झाली असून प्रवासादरम्यान इ तिकीटाऐवजी हा लघुसंदेश दाखविल्यास तो तिकीट म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशांकडे घरात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी जिल्ह्यातील १३ आगारांवर ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे घराजवळच्या कोणत्याही आगारातून प्रवासी राज्यातील कोणत्याही बसचे ऑनलाईन आरक्षण करू शकतात.
प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने रेल्वेच्या धर्तीवर ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. इंटरनेट जोडणी असणाऱ्या प्रवाशांना घरातून बसचे आरक्षित तिकीट मिळविणे दृष्टीपथास आले. परंतु, कित्येक प्रवाशांकडे ही व्यवस्था नसल्याने महामंडळाने ठक्कर बाजार व इतर काही आगारांमध्ये ऑनलाईन आरक्षण नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली. ही सुविधा विशिष्ट काही स्थानकांवर उपलब्ध असल्याचा समज झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी नोंदणीसाठी थेट शहरातील ठक्कर बाजारातही येत असतात. ही बाब लक्षात आल्यावर एसटी महामंडळाने जिल्ह्यातील सर्व आगारांवर ही सेवा नव्या दमाने कार्यप्रवण केली आहे. ग्रामीण भागातील कोणत्याही आगारातून प्रवाशांना राज्यातील कोणत्याही भागातून मार्गस्थ होणाऱ्या एसटी बसचे ऑनलाईन तिकीट काढता येईल, असे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले. या तिकीटासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहरातील आगारांवर येण्याची आवश्यकता नाही. शहरात निमाणी, नाशिकरोड या आगारातही ही सुविधा कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी बसचे इंटरनेट प्रणालीद्वारे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना इ तिकीट प्राप्त होते. हे इ तिकीट प्रवासावेळी त्यांना वाहकास सादर करावे लागते. त्यासोबत ओळखपत्रही सादर करावे लागते. या व्यवस्थेत आता लघुसंदेशाची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन तिकीट आरक्षित करतानाच प्रवाशाला आपला भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा लागेल. तिकीटाची नोंदणी झाल्यावर संबंधित भ्रमणध्वनी क्रमांकावर रेल्वेच्या धर्तीवर महामंडळाच्या सव्‍‌र्हरवरून लघुसंदेशाद्वारे त्याची माहिती दिली जाईल.
प्रवासावेळी प्रवाशाकडे इ तिकीट नसले तरी तो भ्रमणध्वनीवरील आरक्षणाचा लघुसंदेश दाखवून प्रवास करू शकेल. म्हणजे हा लघुसंदेश प्रवाशाचे तिकीट म्हणून ग्राह्य धरले जाईल. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाल्याचे जोशी यांनी सांगितले.