मृत वा स्थलांतरित झालेल्यांची छाननी करून २०१४ वर्षांच्या प्रारंभीच्या पाच महिन्यांत जवळपास ५७ हजार मतदारांच्या नावांना यादीत कात्री लावणाऱ्या निवडणूक शाखेने लोकसभा निवडणुकीत यावरून गदारोळ झाल्यावर पुढील काळात केवळ १७६१ नावे वगळली आहेत. मतदार यादीतील घोळामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून धास्तावलेल्या निवडणूक यंत्रणेने छाननीअंती यादीतून नाव वगळण्याची मोहीम गुंडाळून ठेवली आहे.
नाव वगळण्याची प्रक्रिया करण्याआधी छाननी केली जाते. मयत व्यक्ती, बाहेरगावी वा अन्यत्र स्थलांतरित झालेले अशीच नावे वगळली जातात.
निरंतर स्वरूपात चालणाऱ्या या प्रकियेला लोकसभा निवडणुकीनंतर विश्रांती देण्यात आली. लोकसभा निवडणुकीवेळी सरसकट अनेक नावे ‘डिलीट’ झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. मतदार यादीतील घोळावरून बराच गदारोळ उडाला. अनेक मतदारांची नावे ‘डिलीट’ झाल्यामुळे नागरिकांसह राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेला जबाबदार धरले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे २०१४च्या सुरुवातीपासून छाननी करून नावे वगळण्याच्या प्रक्रियेत नाशिक पश्चिम २१,४३१, नाशिक मध्य १०४६८, नाशिक पूर्व ८१५०, बागलाण २७७२, निफाड २३२७, मालेगाव बाह्य २२४२, कळवण १८७६, मालेगाव मध्य १५४१, चांदवड १३१२, सिन्नर ११८३, इगतपुरी ११५१, येवला १०२०, नांदगाव ६३८, देवळाली ४७७, दिंडोरी १०९ इतकी नावे वगळण्यात आल्याची यादी निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत किती नावे वगळली याची माहिती देताना जिल्हा प्रशासनाने ही प्रक्रिया जवळपास बंद असल्याचे सूचित केले. ज्या मतदारांनी निवडणूक शाखेकडे स्वत:हून अर्ज दाखल केले, केवळ त्यांची छाननी करून १७६१ नावे वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
म्हणजे, उपरोक्त काळात निवडणूक शाखेने स्वत:हून छाननी करून नाव वगळण्याचे धाडस दाखविले नाही. विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा मतदार यादीवरून कोणताही घोळ होऊ नये म्हणून निवडणूक शाखेने ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याचा परिणाम ही मोहीम थांबविण्यात झाला.

विधानसभेसाठी दोन लाख मतदार वाढले
मतदार यादीतून नाव वगळण्याची मोहीम थंडावली असली तरी नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्याच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लोकसभा निवडणुकनंतर आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ८६ हजार मतदार वाढले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत १९ हजार ७०३ अर्ज प्राप्त झाले. त्या अर्जाची छाननी होऊन ही नावे मतदार यादीत समाविष्ट होतील. याचा विचार करता लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दोन लाख मतदार वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ४० लाख ७३ हजार २३५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात मतदारयादीत छायाचित्र असलेल्या मतदारांची टक्केवारी जवळपास ९५ टक्के आहे. यामुळे बोगस मतदानाला चाप लागणार आहे.