एकेकाळची मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी शाळा म्हणून ओळख असलेल्या घाटकोपरमधील सवरेदय विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेला विद्यार्थ्यांअभावी पुढील वर्षांपासून टाळे लागणार आहे. त्यामुळे, मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांकरिता असलेला खासगी अनुदानित शिक्षणाचा एक मोठा स्रोत आता कायमचा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
हे शाळेचे ५०वे वर्ष असून सुवर्ण महोत्सवी वर्षांतच शाळा शेवटच्या घटका मोजत आहे. १९६५ साली स्थापन झालेली ही शाळा सुरवातीच्या वर्षांमध्ये इतकी मोठी होती की आठवी, नववी आणि दहावी या वर्गाच्या तुकडय़ा करताना ‘ए टू झेड’ची २६ मुळाक्षरेही कमी पडायची. म्हणून पुढील तुकडय़ांना झेड१, झेड२ अशी नावे द्यावी लागत. पण, आता या शाळेत दहावीचा २५ विद्यार्थ्यांचा केवळ एकच वर्ग शिल्लक राहिला आहे. खालच्या वर्गात प्रवेशच न झाल्याने आज ही अवस्था शाळेवर ओढवली आहे. दरम्यानच्या काळात शाळेने गुजराती अल्पसंख्याक दर्जा मिळविल्याने नाही म्हणायला शाळेत केवळ याच माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट असतो.
सवरेदय रुग्णालयाची उभारणी करणारे कांतिलाल शेठ यांची ही शाळा. शाळेच्या कारभारात कमीत कमी हस्तक्षेप करण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या काळात शाळा बहरली. घाटकोपर विद्याविहार, कुर्ला, विक्रोळी भागामध्ये त्या काळात गरीब मुलांना परवडतील अशा शाळाही नव्हत्या. त्यामुळे, मोठय़ा संख्येने विविध स्तरातील, वर्गातील विद्यार्थी येत. परंतु, शेठ यांच्या मृत्यूनंतर मुलगी आणि जावयाच्या हातात शाळेचा कारभार गेला आणि शाळेला उतरती कळा लागली, अशा आरोप प्रा. पवार यांनी केला. तर आसपास इतर ठिकाणी शाळा सुरू व्हायला लागल्याने वर्ग आपोआप कमी व्हायला लागले. मधल्या काळात शाळेतील काही शिक्षकांना पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला व्यवस्थापनाने साथ न दिल्याने हा प्रयत्न फोल ठरला, अशी प्रतिक्रिया शाळेच्या एका माजी मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
शाळेत जोपर्यंत चांगले शिक्षक होते तोपर्यंत शाळेचा दर्जा चांगला होता. मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सर्वागीण विकासाकरिता चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न करणारे शिक्षक शाळेत होते. अनेकांची आयुष्ये उभी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. हायकोर्टाचे वकील संजीव सावंत, कवयित्री नीरजा, लायन्स क्लबचे नितीन परब, विकासक संजय नाकवे, अ‍ॅक्सेंचर आयटी कंपनीत काम करणारी शमिका पाटणकर असे वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्ती शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
आता शाळेत अनेक प्राथमिक सुविधा नाहीत. कित्येकदा शाळेची विजेची बिलेही शिक्षकांकडून पैसे जमा करून भरण्यात आली आहेत. चार-चार मजली अशा शाळांच्या दोन इमारती. त्यांच्यामध्ये कबड्डीला पुरेल इतके मैदान. पण, देखभालीअभावी शाळेच्या इमारतींचीही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी वर्ग पावसाळ्यात गळत असतात.

विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांची संख्याही दोनवर आली आहे. एकेकाळी शाळेत तब्बल १३०-१४० शिक्षक होते. त्यातले ३०-३५ शिक्षक निवृत्त झाले तर ७० च्या आसपास अतिरिक्त ठरल्याने अन्य शाळांमध्ये गेले.

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

शाळेला उभारी मिळणार!
महत्त्वाचे म्हणजे ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या माध्यमातून मराठी शाळा टिकाव्या यासाठी झटणाऱ्या प्रा. दीपक पवार यांची ही शाळा. आपल्याच शाळेला या प्रकारची उतरती कळा लागल्याने पवार यांनी केंद्राच्या माध्यमातून पहिला प्रयत्न म्हणून आपल्या शाळेलाच माजी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मदतीने उभारी देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापून शाळेला पुन्हा उभे करण्याचा त्यांचा विचार आहे. ऑक्टोबरमध्ये शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. आता १० मे रोजी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून त्या द्वारे शाळेला वाचविण्याचा माजी विद्यार्थी-शिक्षकांचा प्रयत्न आहे.

सोन्याची किंमत
ही शाळा मेट्रोच्या मार्गापासून १०० ते २०० मीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे, शाळेच्या जागेलाही सोन्याची किंमत आली आहे.

इतर शाळा आणि विस्थापन
आमच्या शाळेत थेट पाचवीपासून प्रवेश होतात. प्राथमिक शाळा नसल्याने पाचवीपासून विद्यार्थी मिळविण्यात अडचणी येतात. तसेच, इतर शाळा पूर्व प्राथमिक ते दहावी पर्यंत आहेत. त्यामुळे विद्यार्थी अशा शाळांना प्राधान्य देतात. इतर शाळा आल्याने काही घरापासून जवळची शाळा निवडू लागले. तर मेट्रोमुळे अनेक कुटुंबे विस्थापित झाल्यानेही शाळेच्या पटसंख्येवर परिणाम झाला.
सुभाषचंद्र पाल, मुख्याध्यापक

रेश्मा शिवडेकर, मुंबई</strong>