’ मुंबईत केवळ ३० टक्के नालेसफाई.. काँग्रेस नगरसेवकांचा आरोप
’ पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती
’ प्रशासन, सत्ताधारी शिवसेना-भाजपचा दावा खोटा असल्याची टीका
पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नद्या आणि नाल्यांच्या सफाईची केवळ ३० टक्के कामे झाली असून नदी-नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. परिणामी, यंदा पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाच्या नालेसफाईच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करणारी सत्ताधारी शिवसेना-भाजप युती मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
नालेसफाईची ९५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने करताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर स्नेहल आंबेकर यांनी नदी-नाल्यांची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. भाजप नगरसेवकांनीही शिवसेनेचा कित्ता गिरवत नालेसफाईची पाहणी केली होती. मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगरसेवकांनी सोमवारी मुंबईतील नदी आणि नाल्यांची पाहणी करून प्रशासनाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
ओशिवरा नदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा तरंगत असून गाळही योग्य पद्धतीने काढण्यात आलेला नाही. याकडे उपस्थित पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी नदीतून गाळ काढताना टिपलेली छायाचित्रे नगरसेवकांना दाखविली. मात्र ओशिवरा नदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा असून २० टक्केही गाळ काढण्यात आलेला नाही, असा आरोप देवेंद्र आंबेरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पोयसर नदीचीही अवस्था अशीच असून केवळ १० टक्के गाळ उपसण्यात आला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे वळणई नाल्याची स्थिती गंभीर आहे. बेहरामबाग येथील इंडियन ऑइल नाला, मोहरा नाला, रसराज नाला, ईर्ला नाला आदी नाल्यांतील गाळ काढून काठावरच टाकण्यात आला आहे. हा गाळ वेळीच हलविला नाही, तर पावसाच्या पाण्याबरोबर तो पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे. नदी-नाल्यांची स्थिती दयनीय असून मुसळधार पावसात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केली.
नालेसफाईबाबत प्रशासन, शिवसेना आणि भाजपकडून करण्यात आलेले दावे खोटे आहेत. दर दिवशी मुंबईत सात ते आठ हजार मे. टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी ३ मे. टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. हा कचरा नाल्यांमध्ये फेकला जातो. पावसाळा जवळ आला तरी हा कचरा नाल्यातून काढलेला नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबई जलमय होण्याची भीती आहे. प्रशासनाच्या नालेसफाईच्या खोटय़ा दाव्यांवर समाधान व्यक्त करणारे सत्ताधारी पालिकेच्या तिजोरीवर हातसफाई करीत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.