कोणताही व्यापार करावयाचा असेल व त्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी भांडवल लागतेच, परंतु ग्राहकांचा विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो. व्यापाराइतकाच राजकारणातही विश्वास महत्वाचा असला तरी फक्त विश्वासावर राजकारण चालत नाही, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी केले.
नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ आणि सभासद सूची प्रकाशन समारंभात ते बोलत होते. व्यापारी हा समाजातील महत्वाचा घटक असून ज्या ठिकाणी गाडी, वीज, बँक पोहचली नाही, तिथे व्यापारी पोहचलेला दिसतो. व्यापाऱ्यांनी तेजी-मंदीचा फायदा घेऊ नये. मग त्यांना ग्राहकांची कमतरता कधीच भासणार नाही, असा सल्लाही गुजराथी यांनी दिला. पूर्वी ९० टक्के व्यापार उधारीवर तर १० टक्के व्यापार रोखीत चालत असे. परंतु आज ही परिस्थिती राहिली नसून बहुतांश व्यापार हा रोखीतच केला जातो. व्यावसायिकांनी काळानुरूप आपल्या व्यवसायाची पद्धत बदलली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी संघटनेच्या ५० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचणाऱ्या या किरकोळ व्यावसायिकांना अनेक कायदा व नियमांचे पालन करावे लागते. हा त्रास कमी होण्यसाठी चेंबरकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. परंतु कायदा करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचेअध्यक्ष अरूण जातेगावकर यांचा यावेळी षष्ठब्दीनिमित्त गुजराथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रामबंधू मसाले उद्योगाचे अध्यक्ष हेमंत राठी, दिलीप साळवेकर, संतोष मंडलेचा, प्रफुल्ल संचेती यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला. मॉल संस्कृती वाढली असली तरी किराणा व्यापारी संपणार नाही. त्यामुळे संघटनेचा अमृत महोत्सव संघटनेच्या व्यापार भवनातच व्हावा अशी आशाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.