एकाकडे सुमारे १००० ते १२०० छायाचित्र मतदार चिठ्ठींचे वाटप. मुदत केवळ चार दिवस. कोणी शिक्षक, कोणी महापालिका वा नगरपालिकेचे कर्मचारी. त्यात प्रामुख्याने महिलांचा समावेश. या चिठ्ठींचे वाटप करताना प्रत्येक मतदाराची स्वाक्षरी घेणे बंधनकारक. कुटुंबप्रमुख वा कुटुंबातील अन्य सदस्यांऐवजी नातेवाईक, शेजारी वा मित्रमंडळींकडे चिठ्ठी देण्यास मज्जाव. जे मतदार प्रत्यक्ष भेटणार नाहीत, त्यांच्या चिठ्ठीवर अनुपस्थित, स्थलांतरित, मयत वा दुबार यातील एक नोंद करणे बंधनकारक. या प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेला मतदार चिठ्ठी मतदानाच्या दिवशी केंद्रालगत वितरित करण्याची जबाबदारी.. अशा एक ना अनेक सूचनांनी त्रस्तावलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहेऱ्यावर रात्रीचा दिवस करून ही सर्कस करावी लागणार असल्याची व्यथा मांडत या कामाचा श्रीगणेशा केला.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील छायाचित्र मतदार चिठ्ठीच्या वाटपास मंगळवारी सुरुवात झाली. विधानसभा मतदारसंघनिहाय या चिठ्ठय़ा वितरित केल्या जाणार आहेत. देवळाली मतदारसंघातील संबंधित कर्मचाऱ्यांना याच दिवशी या बाबतचे प्रशिक्षण देऊन छायाचित्र मतदार याद्या त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशिक्षणात वेगवेगळ्या सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला. या कामासाठी कालावधी अतिशय कमी असल्याने उपस्थित कर्मचारी हबकून गेले. या कामासाठी शेकडो कर्मचारी जुंपले गेले असूनही प्रत्येकाला किमान १००० ते १२०० मतदारांना या चिठ्ठय़ांचे वाटप करावे लागणार आहे. अवघ्या चार ते पाच दिवसांच्या मुदतीत हे काम कसे होणार, याची भ्रांत सर्वाना पडली. यापूर्वी मतदार चिठ्ठी वाटपाचे काम राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत केले जात असे. यंदा प्रथमच ही जबाबदारी निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांवर सोपविली. त्यामागील नेमका उद्देश काय, हेदेखील स्पष्ट होत नसल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना आपले मूळचे काम सांभाळून हा ‘द्राविडी प्राणायाम’ करावा लागणार आहे.
नाशिक व दिंडोरी मतदारसंघात २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. देवळाली मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी छायाचित्र मतदार याद्यांचे वितरण करण्यात आले.
पुढील चार दिवसात हे काम पूर्ण करण्याचे सूचित करण्यात आले. या प्रक्रियेत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे प्रतिनिधी चिठ्ठी वितरणादरम्यान कर्मचाऱ्यांसोबत जाऊ शकतात. त्यांची स्वाक्षरी मतदान वहीवर घेण्याचे सांगण्यात आले. याकरिता प्रथम वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना उपरोक्त वेळापत्रक न दिल्यास तसेच त्यावेळी उपस्थित राहू न देण्याबाबत तक्रारी असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा यंत्रणेने दिला. अर्थात सर्व कर्मचाऱ्यांनी हे काम निष्पक्षपातीपणे करणे अभिप्रेत आहे. याद्या हाती पडल्यानंतरही सर्व प्रक्रिया समजावून घेताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली असून वितरण करताना काय होईल याची धास्ती सर्वाना पडली आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा निवडणूक  अधिकारी विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेत हे काम पूर्ण करण्यासाठी जादा कर्मचारी सोबत घेण्याची मुभा देण्यात आल्याचे सांगितले.
३८ लाखाहून अधिक मतदार
नाशिक लोकसभा मतदारसंघात १५ लाख ९३ हजार ५००, दिंडोरीत १५ लाख २९ हजार ८६४ तर धुळे लोकसभा मतदारसंघातील सात लाख ६४ हजार २९६ असे एकूण जिल्ह्यात ३८ लाख ८७ हजार ६६५ मतदार आहेत. या प्रत्येक मतदारापर्यंत यंदा निवडणूक यंत्रणा म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत छायाचित्र मतदार चिठ्ठी पोहोचविली जाणार आहे.
छायाचित्र मतदार चिठ्ठी वाटपासाठीच्या सूचना
मतदार छायाचित्र चिठ्ठी वितरित केल्यावर नोंदवहीत मतदाराची स्वाक्षरी घेणे.
चिठ्ठी देण्यापूर्वी याच नोंदवहीवर प्रथम कर्मचाऱ्याने स्वत: स्वाक्षरी करायची आहे.
उपरोक्त स्वाक्षरी अथवा स्वाक्षरीचा शिक्का चिठ्ठीवर येऊ देऊ नये. तसे आढळल्यास कारवाई
मतदार छायाचित्र चिठ्ठी प्रत्यक्ष संबंधित मतदारास द्यावी किंवा त्याच्या कुटुंबातील सज्ञान सदस्यास द्यावी.
कोणत्याही परिस्थितीत मतदार छायाचित्र चिठ्ठी एकगठ्ठा पद्धतीने वितरित करता येणार नाही. अथवा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीकडे सोपविता येणार नाही.
वितरित न झालेल्या चिठ्ठय़ांची विहित नमुन्यात यादी करणे.
ही यादी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेरील मदत कक्षावर ठेवली जाईल. त्या ठिकाणी संबंधित कर्मचारी पूर्ण वेळ थांबून मतदारांना शिल्लक राहिलेल्या चिठ्ठय़ांचे वाटप करेल.