‘गुनाहगार कितना भी शातीर क्यो न हो, कुछ न कुछ सुराग पिछे छोड जाता है’ किंवा ‘कानून के हात बडे लंबे होते है’.. अशी हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध वाक्ये आपण नेहमी ऐकत आलो आहोत. गुन्हेगार कितीही चतूर असला तरीही तो काहीना काही पुरावा मागे सोडून जातोच.. पण कायद्याचे रक्षक सहसा त्याच्यापेक्षा काकणभर सरसच असतात. गुन्हेगाराने काळजीपूर्वक केलेल्या गुन्ह्यंत नकळतपणे मागे ठेवलेल्या क्षुल्लकशा ‘सुता’वरून त्याचा माग काढून त्याला शासन घडविण्याचे जिकिरीचे काम पोलीस करीत असतात. अत्यंत नगण्य वाटणाऱ्या पुराव्यांवरून पोलिसांनी आरोपींना शोधून काढल्याच्या या काही घटना..
टॉर्च विकायला गेला अन्
ऑगस्ट २०१२
मुंबईच्या आझाद मैदानात ११ ऑगस्ट २०१२ रोजी दंगल उसळली. या प्रकरणातला एक आरोपी सलीम चौकिया अनेक दिवस पोलिसांना चकमा देत होता. पकडले जाऊ या भीतीने त्याने दाढी काढून वेशांतर केले होते. तसेच तो घराबाहेरही पडत नव्हता. त्याचा टॉर्च, बॅटरी, मोबाईल आदी स्टेशनरी साहित्य विकण्याचा व्यवसाय होता. ती माहिती पोलिसांना होती. ओशिवरा पोलिसांनी त्याला फोन करून टॉर्च विकत घ्यायचा आहे, पोलीस ठाण्यात ये, असे सांगितले. पंरतु तो आला नाही. नंतर मोठी ऑर्डर आहे, असे सांगताच मोहापायी तो तयार झाला. पण पोलीस ठाण्यात येणार नाही, एका हॉटेलमध्ये आपला माल ठेवतो, असे त्याने सांगितले. ठरल्याप्रमाणे तो माल ठेवण्यासाठी त्या हॉटेलमध्ये गेला आणि पकडला गेला.

वहीचे फाडलेले पान
१८ ऑक्टोबर २०१२
बोरिवली येथील धीरज पंडीत या ८ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या झाली होती. खंडणी मागण्यासाठी धीरजच्या दारावर एक कागद चिटवण्यात आला होता. वहीच्या पानावर खंडणी मागणारा मजकूर लिहिण्यात आला होता. अपहरणकर्त्यांने वहीच्या पानावर लिहिले आगे म्हणजे अपहरणकर्ता शाळकरी मुलगा असावा, असा कयास पोलिसांनी बांधला. त्वरीत परिसरातल्या मुलांच्या वह्या तपासण्यात आला. शेजारीच राहणाऱ्या धीरजच्या १६ वर्षीय चुलत भावाच्या वहीचे एक पान फाटलेले आढळले. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे अक्षरही जुळले आणि नंतर त्याने खुनाची कबुलीही दिली
 
फेसबुकवरील मैत्री
१० फेब्रुवारी २०१३
अडीच लाखांची रोकड घेऊन फरार झालेला विजय चौधरी दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु एका बेसावध क्षणी त्याने फेसबुकवर एका अनोळखी मुलीशी मैत्री केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. चर्नी रोडच्या ‘कलेक्शन अ‍ॅण्ड मोर’ या मोबाईल दुकानात काम करणारा विजय चौधरी (२३) १७ डिसेंबरला बँकेत भरायला दिलेले अडीच लाख रुपये घेऊन फरार झाला होता. मालकाकडे त्याचा काहीच पत्ता अथवा ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे त्याला शोधणे कठीणहोते. पण त्याच्या फेसबुकवर खूप मुली आहेत, त्याला मुलींचा नाद आहे एवढेच पोलिसांना कळले होते. पोलिसांनी मग त्याला पकडण्यासाठी एका मुलीचे बनावट अकाऊंट उघडून त्याला ‘फ्रेंडशिप रिक्वेस्ट’ पाठवली. पण ते अकाऊंट बनावट असल्याचा संशय आल्याने त्याने ती नाकारली. मग पोलिसांनी आपल्या एका ओळखीच्या मुलीला त्याच्याशी फेसबुकवर मैत्री करायला सांगितले. या मुलीच्या अकाऊंटवरून ते अकाऊंट खरे असल्याची विजयला खात्री पटली. त्याने ती रिक्वेस्ट स्वीकारली. या मुलीने हळूहळू त्याच्याशी चॅटिंग करत मैत्री केली. मोबाईल नंबर मागितला. त्याचा सीडीआर (मोबाईलचे टॉवर लोकेशन) तो नागपूरला असल्याचे दाखवत होते. मग या मुलीने त्याला भेटायची गळ घातली. या सुंदर मुलीच्या मोहात पडलेला विजय तिला भेटायला मुंबईत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

फक्त एक मेसेज
१३ फेब्रुवारी २०१३
 बोरिवलीचे पर्यटन व्यावसायिक निलेश उपाध्याय यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्यांचाच मित्र सावंत याने केल्याचे उघड झाले. सावंत याने उपाध्याय यांना पार्टीसाठी बोलावले आणि तलासरी येथे नेऊन त्यांची हत्या केली. सावंत हा उपाध्याय यांचा कौटुंबिक मित्र होता. उपाध्याय आपली पत्नी वर्षां हिला प्रेमाने ‘शटल इंजिन’ अशी हाक मारायचे. उपाध्याय यांचे अपहरण केल्यानंतर सावंतने उपाध्याय यांच्याच मोबाईलवरून वर्षांला मेसेज पाठवला, ‘प्रिय मोटर इंजिन, मी मध्यप्रदेशला कामासाठी चाललोय. आठवडय़ाभराने परत येईन. काळजी करू नको.’ उपाध्याय आपल्या पत्नीशी बोलताना इंजिनसारखा शब्द वापरतात हे सावंतला माहीत होते. त्यामुळे उपाध्यायनेच हा मेसेज पाठवला आहे हे दाखविण्यासाठी त्याने इंजिन शब्द वापरला होता. पण तो अर्धवट होता. नेहमी आपल्याला ‘शटल इंजिन’ म्हणणारा पती आज ‘मोटर इंजिन’ असे का म्हणाला, असा वर्षां यांना संशय आला आणि सावंत पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मोबाईल वॉलपेपर
१७ फेब्रुवारी २०१३
मालाडच्या झकेरिया रोडवरील शंकरलाल अ‍ॅण्ड कंपनी या सराफाच्या दुकानात चोरी झाली. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे होते. परंतु चोराने रात्री चोरी करताना लाईट बंद करण्याची हुशारी केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नेमकी व्यक्ती नव्हे तर फक्त एक मानवाकृती दिसत होती. परंतु त्या चोराने उजेडासाठी आपल्या मोबाईलचा टॉर्च म्हणून वापर केला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोबाईलचा उजेड दिसत होता. आणि मोबाईलचा वॉलपेपरही स्पष्टपणे दिसत होता. एका हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध दृश्याचा वॉलपेपर त्याने लावला होता. गुन्हेगाराने अक्षरश: काहीही माग मागे ठेवलेला नव्हता. पण मग पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या सर्वाचे मोबाईल तपासले. त्यापैकी मोहम्मद सलमान शेख याच्या मोबाईलवर तोच वॉलपेपर होता. अखेर त्यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अंधुकशा दिसणाऱ्या २ इंचाच्या मोबाईल वॉलपेपरवरून पोलिसांनी त्याला गजाआड केले होते.