स्वच्छ भारत मोहिमेमध्ये भारतीय रेल्वेने सुरुवातीपासूनच महत्त्वाचा वाटा उचलत या मोहिमेबाबत जागरूकता दाखवली आहे. पश्चिम रेल्वेच्या निवडक गाडय़ांमध्ये चालत्या गाडीत सफाई करण्यासाठी ‘ऑन बोर्ड हाउसकिपिंग सर्व्हिस’ प्रणाली सध्या कार्यरत आहेच. पण आता रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडय़ाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत या सुविधेला एसएमएसचीही जोड दिली आहे. त्याचप्रमाणे ही सुविधा आता आणखी काही गाडय़ांमध्येही देण्यात आली आहे. आता डबा किंवा आसनाजवळील भाग अस्वच्छ असल्यास प्रवासी मोबाइलवरून एसएमएसद्वारे ऑन बोर्ड हाउसकीिपग कर्मचाऱ्यांना त्याबाबत कळवू शकतात.
पश्चिम रेल्वेवर स्वच्छतेच्या दृष्टीने सध्या २३ गाडय़ांमधील ४८ डब्यांसाठी ऑन बोर्ड हाउसकीिपग सेवा पुरवली जाते. चालत्या गाडीत दर काही वेळाने रेल्वेचे कर्मचारी येऊन डबा व्यवस्थित झाडून आणि पुसून जातात. त्यानंतर डब्यात सुगंधी द्रव्यही फवारले जाते. या सेवेला प्रवाशांनी चांगलीच पसंती दिली होती. आता प्रवासी सुविधा पंधरवडय़ाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने ही सेवा आणखी २९ गाडय़ांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणखी स्वच्छ असतील.
त्याच्या पलिकडे जाऊन पश्चिम रेल्वेने प्रवाशांचा विचार करत प्रवाशांना एसएमएसद्वारे ही सेवा मिळेल, अशी योजना सुरू केली आहे. सुरुवातीला निवडक गाडय़ांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल. प्रवाशांना त्यांचा डबा किंवा आसन अस्वच्छ आहे, असे वाटल्यास फक्त एक एसएमएस करायचा आहे. एसएमएस पाठवताना ‘क्लीन’ असे लिहून त्यापुढे दहा अंकी पीएनआर क्रमांक टाकायचा आहे. हा एसएमएस ०९००४४४९९९० या क्रमांकावर पाठवायचा आहे. हा एसएमएस गाडीतील ऑन बोर्ड हाउसकीिपग सेवा देणाऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर प्रवाशांना तात्काळ ही सेवा पुरवली जाणार आहे.
तसेच पश्चिम रेल्वेच्या सर्व गाडय़ांची सफाई अहमदाबाद आणि रतलाम या दोन स्थानकांवर करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही स्थानकांवर पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गाडी या दोन स्थानकांत आली की, ती सुटण्याआधी रेल्वेचे कर्मचारी सर्व गाडी स्वच्छ करणार आहेत. सध्या अहमदाबाद येथे दर दिवशी १९७ डबे आणि रतलाम येथे १५६ डबे स्वच्छ केले जातात.
ऑन बोर्ड हाउसकीिपग सेवा असलेल्या काही गाडय़ा
मुंबई सेंट्रल-ओखा एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-दिल्ली राजधानी एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-दिल्ली ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस, अवध एक्सप्रेस, महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस.