पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये खुलेआम निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असताना निवडणूक यंत्रणा मात्र गाफील असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक खासगी वाहनांवर उमेदवारांचे प्रचार पोस्टर झळकत आहेत.
पनवेलमध्ये आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांच्या काचांवर छापील पद्धतीने आपल्या आवडत्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला. हा प्रचार प्रशांत ठाकूर आणि बाळाराम पाटील या दोन्ही राजकीय उमेदवारांचा आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप करून इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असणाऱ्या प्रशांत ठाकूर यांचे नाव, त्यांच्या छायाचित्रासह कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह असे टाटा मॅजिक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षाच्या मागील काचांवर प्रसिद्ध केले आहे. तसेच शेकापचे बाळाराम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मालकीच्या मोटारींच्या मागील काचांवर पाटील यांच्या छायाचित्रासह शेकापच्या निवडणूक चिन्हाला प्रसिद्ध केले आहे.
याबाबत पनवेलचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाहनांच्या काचेवर निवडणूक काळात उमेदवारांच्या केलेल्या प्रसिद्धीसाठी वाहनमालकांनी अथवा राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडून रीतसर परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे त्या वाहनांची नोंद आमच्याकडे नाही. अशी विनापरवानगी घेऊन वाहनांवर प्रचार सुरू असल्याचे आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करू. त्याबद्दल प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.