नवी मुंबई पोलिसांनी १ जुलै ते २१ जुल या कालावधीत चालविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ शोधमोहिमेला मोठे यश लाभले असून नवी मुंबईतील ४६ मुले स्वगृही परतली आहेत. यामध्ये ३५ मुले हरवली होती, तर ११ मुलांचे अपहरण झाले होते. याशिवाय नवी मुंबईत ८ बेवारस मुलांना बाल कल्याण समिती, भिवंडी व कर्जत यांच्यासमोर हजर करून बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यातील २० बालकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेच्या पोलीस आधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधून काढले आहे. नवी मुंबई परिसरातून गेल्या काही महिन्यांत मुले हरविण्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या मोहिमेनंतर कौपरखरणे व तुभ्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १, नेरुळ येथील ५, एनआरआय येथील २, खारघर येथील ३ व पनवेलमधील ७ मुले पोलिसांना सापडली. याशिवाय अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेने १६ मुलांचा छडा लावला. अपहरण झालेल्या ११ मुलांमध्ये एपीएमसी, खारघर, कामोठे व रबाले हद्दीतील ३ व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेकडे तपास असलेल्या ४ मुलांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिसांकडून गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या या शोधमोहिमेत हरविलेल्या व पळविलेल्या मुलांची माहिती नव्याने संकलित करण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील मुंलाचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानके, रस्त्यावर सिग्नलवर भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले तसेच धार्मिक स्थळे, रुग्णालये इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले आदींची फोटोसह अद्ययावत माहिती बाल कल्याण समितीच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात आली.