महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा, यासाठी सत्ताधारी मनसेने केलेल्या आंदोलनाविषयी पालिका वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे पानिपत होऊ नये म्हणून हा प्रसिध्दीचा ‘स्टंट’ असल्याची टीका काँग्रेसने केली असून पूर्णवेळ आयुक्त असताना मनसेने नेमकी कोणती विकास कामे केली असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. पालिकेच्या कारभारात मनसेची सत्तासंगत करणारी भाजप या आंदोलनापासून दूर राहिली. त्याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. पालिकेतील सत्ताधाऱ्यांप्रमाणे राज्य शासनही त्यास जबाबदार असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. या आंदोलनाविषयी राजकीय पक्षांनी मांडलेल्या भूमिका त्यांच्याच शब्दात..

ही तर मनसेची ‘स्टंटबाजी’
पालिकेतील सत्ताधारी मनसे या पध्दतीने आंदोलन करणार असेल तर शहरवासीयांनी काय करायचे ? पूर्णवेळ आयुक्त नसल्यावरून मनसे जे आरोप करत आहे, त्यात कोणतेही तथ्य
नाही. उलट महापौर व उपमहापौर ही
बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात कमी पडले. सध्या प्रभारी आयुक्त पालिकेचा कार्यभार सांभाळत आहे. त्यांच्यामार्फत सर्व कामे केली जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनाची स्टंटबाजी करून शहरवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मनसे करत आहे.
लक्ष्मण जायभावे गटनेता (काँग्रेस)

नाचता येईना अंगण वाकडे
मनसे ही केवळ एक नाटक कंपनी आहे. त्यांच्या नाटकातील शेवटचा अंक आता सुरू झाला आहे. पूर्णवेळ आयुक्त नसल्याच्या मुद्यावरून मनसेने आंदोलन केले. महापालिकेत चार महिन्यांपासून आयुक्त नसले तरी तत्पुर्वीचे दोन ते सव्वा दोन वर्ष जेव्हा पूर्णवेळ आयुक्त होते, तेव्हा मनसेने काय केले ? मनसेची गत ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर कोणताही अंकुश नाही. काम करता येत नसेल तर मनसेने खुर्ची सोडावी. या पक्षाचे तीन आमदार असूनही ते या प्रश्नावर कधी मुख्यमंत्र्यांना भेटले नाहीत.
– अजय बोरस्ते, गटनेता (शिवसेना)