* तरुणाईत व्हॅलेंटाईन ज्वर,
* इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ व्यस्त
* विहिंप, बजरंग दल, भाविसेचा विरोध
* जोडप्यांचे जागेवरच शुभमंगल लावणार
दोन दिवसांवर आलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरुणाईला प्रतीक्षा असली तरी समर्थक आणि विरोधक पुढे सरसावल्याने तणावाची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेने या दिनाचा विरोध केला असून राष्ट्रप्रेमी युवा दल आणि विदर्भ युथ कौन्सिलने तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी दिनाचे समर्थन केले आहे.
गुरुवारी शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी युवक- युवतीचा शहरातील विविध भाागात होणार जल्लोश रोखण्यासाठी व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे धंतोली परिसरातील गोरक्षण सभेतून दुपारी ४ वाजता ‘इशारा मिरवणूक’ काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक दीक्षाभूमी, लक्ष्मीनगर, शंकरनगर, लॉ कॉलेज, फुटाळा तलाव, जीपीओ चौक, महाराजबाग, व्हरायटी चौक या मार्गाने फिरून सीताबर्डीतील मुंजे चौकात त्याचा समारोप होणार आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुण व तरुणी रस्त्यावर किंवा उद्यानात फिरताना दिसल्यास त्यांच्यावर परिषद आणि बजरंग  दलाच्या कार्यकर्त्यांची करडी नजर राहणार आहे.
अतिउत्साही तरुण-तरुणींना विवाह बंधनात अडकवण्यासाठी दलाने तयारी केली आहे. यासाठी बजरंग दलाची चार पथके आणि दोन पुरोहित पूर्ण तयारीत राहणार आहेत. विवाह सोहोळ्यास लागणारे साहित्य ते सोबत ठेवणार आहेत. ‘शुभमंगल.. सावधान’च्या तयारीने दलाचे कार्यकर्ते दिवसभर सर्व संबंधित भागात फिरणार आहेत. त्यामुळे तरुणांनी सावध राहावे, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. पाश्चात्य संस्कृतीचे लांगुलचालन करण्याला विरोध करणे गरजेचे आहे. दुकानातील वस्तू विकण्यासाठी अशा दिवसाचे व्यापारीकरण करण्याऱ्या प्रवृत्ती प्रबळ होत आहेत. जग सर्वासाठी आहे आणि सर्व प्राणीमात्रांना जगण्याचा समान अधिकार असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. आज मात्र, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो. सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरातील तरुण व तरुणींना अशा अपप्रवृत्तींपासून सावध करावे, असे आवाहनही बजरंग दलाचे विदर्भ प्रमुख सुबोध आचार्य यांनी केले आहे.   दुसरीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तरुण व तरुणींना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रप्रेमी युवा दलाचे बाबा मेंढे यांनी केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात येणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले.  सर्वानी बिनधास्तपणे हा दिवस साजरा करावा, असे आवाहन विदर्भ युथ कौन्सिलने व्हॅलेंटाईन दिनाचे समर्थन केले आहे.
प्रतिनिधी, नागपूर
दोनच दिवसावर येऊन ठेवलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या ज्वराने तरुणाईला ग्रासले असून तरुणाईच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन खास त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठा सजलेल्या दिसून येत आहेत. जागतिक स्तरावर व्हॅलेंटाईन डे मोठय़ा खुशीत, धामधुमीत साजरा करण्यात येतो. आपल्याकडे तो कमीअधिक प्रमाणात लपूनछपून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईनला होणारा विरोध लक्षात घेऊन तरुणाईने त्यावर एक उपाय शोधला आहे. तरुणाईने केवळ १४ फेब्रुवारीचा एक दिवसाचा व्हॅलेंटाईन डे मोडीत काढण्यासाठी आता सात दिवस व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यास सुरुवात केली. त्यातील पहिला दिवस सात फेब्रुवारीला ‘रोझ डे’ म्हणून साजरा करण्यात आला. आठ फेब्रुवारीला प्रपोज डे, नऊ फेब्रुवारीला चॉकलेट डे, १० फेब्रुवारीला टेडी डे, त्यानंतर प्रॉमिस डे, आजचा हग डे, बुधवारी किसिंग डे आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे. त्यामुळे संस्कृतीच्या नावावर प्रेमी युगुलांना त्रास देणाऱ्या सनातन्यांचा पुरता फज्जा उडाला आहे.
पूर्वीसारखी भेटकार्डाच्या रूपाने भेटवस्तू, एखादी किमती भेट, गुलाबाची फुले किंवा पुष्पगुच्छांची जागा आता नागपूरच्या बाहेर मनमुराद फिरणे, खानेपिणे आणि एैश करण्याबरोबरच संगणकावरूनच व्हॅलेंटाईन संदेश आदानप्रदान मोठय़ा प्रमाणात होते आहे.  त्यात व्हॅलेंटाईनशी निगडित हलकेफुलके जोक्, व्हॅलेंटाईन अॅनिमेशन, व्हॅलेंटाईन वॉलपेपर, स्क्रिन सेव्हर आदींनी हा व्हॅलेंटाईन आठवडा अधिक जिवंत करण्याचा प्रयत्न तरुणाईकडून केला जात आहे. तरुणाईचा व्हॅलेंटाईनला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दूरचित्रवाहिन्यांमध्येही प्रेमाचे विविध रंग दाखवण्यासाठी त्यामुळेच भरगच्च कार्यक्रम सुरू केले असून अटीतटीची स्पर्धा त्यांच्यात दिसून येत आहे. खास करून मनोरंजन करणाऱ्या चॅनल्सवर गेल्या ७ फेब्रुवारीपासून ‘रिअॅलिटी शो’च्या जाहिराती मोठय़ा प्रमाणात झळकत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे बॉलिवुडची आघाडीची सिनेतारका अनुष्का शर्माच्या बिकनीमधील छायाचित्रांची मोठय़ा प्रमाणात एसएमएसद्वारे आदानप्रदान होत असून व्हॅलेंटाईन नि:शुल्क अॅनिमेशन ऑफरही दिल्या जात आहेत.
तरुणाईतील हा व्हॅलेंटाईन ज्वर येत्या १४ फेब्रुवारीला आणखी वाढण्याची शक्यता असून त्यांच्या प्रेम रंगाचा बेरंग विरोधी संघटना कसा करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
वन बिलियन रायझिंग व माय एफएम यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारीला व्हँलेटाईन डे निमित्त स्त्री सन्मान हस्ताक्षर अभियान राबविण्यात येणार आहे. फुटाळा तलाव परिसरात दुपारी ३ वाजेपासून या अभियानाला प्रारंभ होणार आहे. या संदर्भात माहिती देताना कार्यक्रमाचे आयोजक जम्मू आनंद यांनी सांगितले, १६० देशामध्ये या प्रकारचे अभियान राबविले जातात. या अभियानाच्यावेळी महापौर अनिल सोले, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित राहणार आहे. यावेळी विविध महाविद्यालयातील युवती, महिला, नागरिक सहभागी होणार असून महिला हिंसा मुक्त समाज आणि स्त्री सन्मान म्हणून शपथ घेणार आहे. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन शुभदा वाघ, संजय देशपांडे रेखा बाराहाते यांनी केले आहे.