सध्या नोंदणी विवाहाकडे नवदाम्पत्यांचे विशेष आकर्षण दिसून येत असून गेल्या सव्वा वर्षांत शहरातील नोंदणी कार्यालयात १९१० नोंदणी विवाह झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सामूहिक विवाह समारंभाप्रमाणेच नोंदणी विवाहाला समाजमान्यता मिळत असल्याने व विवाह समारंभास होत असलेला वारेमाप खर्च टाळण्यासाठी नोंदणी विवाह करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
विवाह म्हणजे हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक संस्कार असून सर्वच धर्मात विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोन कुटुंबीयांना एकत्र आणणारा कार्यक्रम, नवदांपत्यांच्या जीवनाची वाटचाल सुरू करणारा सोहळा म्हणून विवाहाकडे बघितले जाते. शासनाने देखील विवाहाची नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. विवाहानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. यावर नोंदणी विवाह हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या विवाहाला सरकारची मान्यता मिळाल्याने वधू-वरांपैकी एका पक्षाचा जरी विरोध असला तरी विवाह काही थांबत नाही. यामुळे प्रेम विवाह करणारे न्यायालयाच्याच आश्रयाला येतात. पण आता नोंदणी विवाहाबाबत जागरुकता वाढत असल्याने प्रेमविवाह करणाऱ्यांसोबत इतरही नवदाम्पत्य इकडे वळली आहेत.
सर्वच धर्मात प्रथेनुसार कुटुंबीय मोठय़ा उत्साहात लग्नाची तयारी करत असतात. लग्नाच्या वेळी खरेदी, रोशनाई, स्वादिष्ट पदार्थाची रेलचेल असते. आता खर्च करायचा नाही तर केव्हा, असा प्रश्न वधू-वर यांच्या मनात येतो. विवाह व्यवस्था कितीही चांगली असली तरी ऐन विवाहाच्यावेळी मानपानावरून रुसवेफुगवे, खाद्यपदार्थाची नासाडी या सर्व बाबी होत असतात. हे सर्व टाळण्यासाठी सरळ-सरळ न्यायालयात जाऊन विवाह करायचा व नंतर छोटेखानी प्रीतिभोज देऊन मोकळे व्हायचे, हा अगदी मस्त पर्याय आहे. यातून पैशाची बचत होते. हाच पैसा पुढील आयुष्यासाठी कामी पडतो. या विचारानेही नोंदणी विवाह केला जात आहे.
नोंदणी विवाह करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. विवाह करायचा असेल तर एक महिना अगोदर एक साधा अर्ज भरून द्यावा लागतो. त्यात नमूद केलेल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये वयाचा दाखला, रहिवासी दाखला व विवाहाला संमती दर्शविणारे तीन साक्षीदार आवश्यक असतात. नोंदणी केल्यावर एक महिन्याची वेळ देण्यात येते. त्यानंतर ६० दिवसात हा विवाह कोणत्याही दिवशी करता येतो. विवाह अधिकार कार्यालयाच्या वतीने वधू-वरांच्या नातेवाईंक अथवा संबंधितांना विशेष विवाह कायद्यांतर्गत नोटीस द्यावी लागते. काही जण आई- वडिलांच्या विरोधात जाऊन पळून लग्न करतात. ही मंडळी कुठल्याही शहरात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे दोघांपैकी एकाचा पुरावा तरी कार्यालयाकडे असावा म्हणून विवाह नोंदणी कार्यालयाने वर किंवा वधू स्थानिक रहिवासी असावी, अशी अट ठेवली आहे. दुसरा इतर जिल्ह्य़ातील रहिवासी असल्यास त्याची एक प्रत त्या जिल्ह्य़ातील नोंदणी विवाह अधिकाऱ्याकडे पाठवली जाते.
नोकरीसाठी इतर देशात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आहे. अनेक जण पत्नीला सोबत घेऊन जाणे पसंत करतात. परदेशात जाण्यासाठी व्हिसा महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिसा कार्यालयात विवाह कार्यालयातील कागदपत्रांची आवश्यकता असते. यामुळे विदेशात जाणारे अनेक लोक आपला विवाह न्यायालयातून करण्यास प्राधान्य देतात. नागपुरातील विवाह अधिकारी कार्यालयातून विवाह करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. असे विवाह करणारे एकाच धर्माचे नाहीत तर मुस्लिम, शिख, ख्रिश्चन व अन्य धर्मीयांचाही समावेश आहे. नागपुरातील विवाह नोंदणी कार्यालयात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत १२९० तर १ जानेवारी ते २८ एप्रिलपर्यंत ६२० विवाह पार पडल्याचे कार्यालयातील नोंदीवरून दिसून येते. दररोज सुमारे चार ते पाच विवाह नोंदणी पद्धतीने होतात. अनेकदा नोंदणी अधिकाऱ्यांना दोन्ही पक्षांची समजूत घालावी लागत असल्याचे चित्र या कार्यालयात दिसून येते.