महापौर प्रा. अनिल सोले यांनी महापालिकेतील १३०० शिक्षक आणि ९ हजार कर्मचाऱ्यांना ८ टक्के महागाई भत्ता देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील असलेल्या मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.
नुकतीच पदाधिकारी, अधिकारी आणि नागपूर महापालिका शिक्षक संघाची मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा, महागाई भत्ता याविषयी संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर संदीप जाधव, सत्ता पक्षनेते प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त हेमंतकुमार पवार, शिक्षण उपसभापती, प्रवीण भिसीकर, शिक्षणाधिकारी मंगला चव्हाण, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर आदी यावेळी उपस्थित होते.
महापौर यांनी शिक्षकांच्या मागण्यांवर उपाय शोधत शिक्षकांबरोबरच कर्मचाऱ्यांना ८ टक्के महागाई भत्ता देण्याचे आदेश दिले. तसेच मुख्यध्यापकांच्या असलेल्या रिक्त जागा, शाळा निरीक्षकांच्या जागा, पदोन्नतीने भरण्याचे व वरिष्ठ श्रेणी निवडश्रेणीविषयी तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठ श्रेणीतील मुख्याध्यापकांची फाईल हरविल्याविषयी कारवाईची मागणी शिक्षक संघाने केली. २०११ व २०१२ या वर्षांतील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र लवकर मिळावे, अशी देखील मागणी यावेळी केली. याप्रसंगी शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.
शिक्षकांबरोबरच १० हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश दिले असल्याने महापलिका प्रशासनावर प्रतिमहिना १ कोटी २२ लाख रुपयाचा आर्थिक भार पडणार आहे. इतका निधी कोठून आणायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. महापालिकेत एलबीटीच्या पहिल्या तिमाहीत ३९ कोटी जमा झाले. मागील वर्षी ११४ कोटी महापालिकेत पहिल्या तिमाहीत मिळाले.