शिक्षकांना आज मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी संस्थांनी कटीबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. चर्चासत्र, परिषद व शैक्षणिक प्रदर्शनांच्या सहभागातून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आत्मप्रेरणा व विश्वास निर्माण होत असतो, असे प्रतिपादन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी केले.
नाशिकरोड येथील चांडक-बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद यांच्या वतीने आणि डॉ. एम. एस. जी. फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित ‘एकूण शिक्षण प्रणालीतील दर्जात्मक व्यवस्थापन-सुधारणा’ या विषयावरील तीन दिवसीय २१ व्या राष्ट्रीय अधिवेशन व परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. राजन वेळुकर, डॉ. जी. टी. पानसे, डॉ. विजय गोसावी, डॉ. सुनंदा एडके आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी प्रास्तविकात गत २४ चर्चासत्रांसंबंधी माहिती दिली. त्यानंतर ‘एज्युकेअर व परिवर्तन’ चे डॉ. वेळुकर यांच्या हस्ते, ‘स्वयंप्रेरणा’चे प्राचार्य एस. बी. पंडित यांच्या हस्ते तर ‘स्वयंप्रकाश’चे डॉ. पानसे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर डॉ. गोवारीकर यांना ‘ना. गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्र अवॉर्ड २०१४’ देऊन डॉ. गोसावी यांच्या हस्ते सन्मानित करण्यातोले. सन्मानपत्राचे वाचन डॉ. के. आर. शिंपी यांनी केले.
विविध पाच शैक्षणिक प्रदर्शनांचे उद्घाटन डॉ. वेळुकर आणि डॉ. गोसावी यांच्या हस्ते झाले. डॉ. वेळुकर यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी व शैक्षणिक गुणवत्ता आणण्यासाठी इ-गव्हर्नन्स अभ्यासक्रमात बदलाची आवश्यकता व्यक्त केली. संख्यात्मक संख्येबरोबरच गुणात्मक बदलाची आवश्यकता आहे. सर्वत्र मुक्त शिक्षणाची गरज, बौद्धीक चातुर्याबरोबरच सतर्कतेच्या दृष्टिकोनाची आवश्यकता असल्याचे नमूद केले. डॉ. गोवारीकर यांनी जगाला आज अणुशक्तीचा एकच पर्याय असल्याचे सांगून कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने त्याचे घातक परिणाम सजीव सृष्टीवर होत असल्याचे सांगितले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन प्रा. विजया धनेश्वर यांनी केले. आभार प्रा. बी. देवराज यांनी मानले.
दुपारच्या तांत्रिक सत्रात ‘ऊर्जा व्यवस्थापन’, ‘उच्च शिक्षण व शालेय शिक्षणात गुणवत्ता व्यवस्थापन’ या विषयांवर चर्चासत्रे झाली. चर्चासत्रात डॉ. वेळुकर, डॉ. गोसावी, डॉ. गोवारीकर आदींनी मार्गदर्शन केले. डॉ. एन. पी. पाटील, डॉ. सरिता औरंगाबादकर, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, डॉ. व्ही. झेड. साळी, डॉ. स्मिता देशपांडे आदींनी संशोधनपर प्रबंध सादर केले.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.