ओरिगामी म्हणजेच कागदाला घड्या घालून तयार करण्यात आलेली कलाकृती. या कलाकृतींचे ‘वंडरफोल्ड १२ ’ हे प्रदर्शन येत्या ७ डिसेंबरपासून मुंबईच्या पु. ल. देशपांडे कलादालनात भरविण्यात येत असून ते  १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. कागदाच्या घड्या घालून त्यातून सुंदर कलाकृती बनविण्याची ही कला जपानमध्ये उदयास आली आणि आज तिचा जगभर प्रसार झालेला आढळतो. अगदी साधा कागद, एखादया पक्षाचे, प्राण्याचे किंवा एखादया वस्तूचे रूप कसे घेतो ते पाहणे मोठे मौजेचे ठरते.एक कला म्हणून ओरीगामिचे महत्त्व आहेच. पण ह्या कलेच्या मागील गणिताचा, एखादी कलाकृती बनल्यावर ती उलगडून कागदावर तयार झालेल्या रेषा रचनेचा अभ्यास करून त्याचा उपयोग आता अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, अंतराळसंशोधन, ह्यामध्येही होऊ लागला आहे. अगदी कमी जागेत एखादी मोठी वस्तू सामावण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. (नकाशे, तंबू, अवकाशयानातून पाठवावयाचे िभग, मोटारीतील एअर कुशन, इ.) शिवाय हस्ताकौशाल्यासाठी, एकाग्रता वाढविणे, मानसिक स्वास्थ्य सुधारणे ह्यासाठी उपचार म्हणून ओरीगामीचा उपयोग केला जातो. व्यसनी आणि कैद्यांना कृतीशील बनविण्यासाठीही ओरिगामी शिकवतात. प्रदर्शनाचे उदघाटन ७ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबईतील जपानी कौन्सुल जनरल श्री कियोशी असाको सान ह्यांच्या हस्ते होत आहे.  हे प्रदर्शन पु. ल. देशपांडे कलादालन, रिवद्र नाट्यमंदिर, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे भरविण्यात येत असून ते ७ ते १० डिसेंबर दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा पर्यंतच चालू रहाणार आहे.