विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहात अनधिकृतपणे शिरकाव करणे तसेच आदिवासी वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गृहपालांना केलेली मारहाण व शिवीगाळ या घटनांच्या निषेधार्थ आदिवासी विकास विभाग कार्यालयीन कर्मचारी संघटनेने शुक्रवारी काम बंद करत निदर्शने केली. बहुतांश कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आदिवासी विकास भवन कार्यालयात शुकशुकाट पसरला. गुंडगिरी व खंडणीची भाषा करणाऱ्या संघटनांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.
दिंडोरी येथील शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात काही संघटनांचे पदाधिकारी जबरदस्तीने शिरकाव करत विद्यार्थ्यांना तक्रार करण्यास भाग पाडले. तसेच वसतिगृहाचे गृहपाल व अधीक्षिका यांना विद्यार्थ्यांसमोर मानहानीकारक वागणूक दिली, असा आरोप आंदोलकांनी केला. वरिष्ठांकडे तक्रारीची व निलंबित करण्याची धमकी देऊन संबंधितांनी दरमहा अर्थसाहाय्य देण्याची मागणी केल्याचे कर्मचारी संघटनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अपर आयुक्त कार्यालयाच्या बाहेरील व्हरांडय़ात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गृहपालास मारहाण केली. येवला येथे आदिवासी मुलींच्या वसतिगृहात काही अनोळखी लोकांच्या समूहाने परवानगी न घेता विद्यार्थिनींच्या खोल्यांमध्ये जाऊन पाहणी केली. वास्तविक, बाहेरील अथवा संघटनेला वसतिगृहात प्रवेशासाठी गृहपाल अथवा वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास हा प्रवेश अनधिकृत समजला जातो. परंतु, अनोळखी व्यक्तींनी आपण या संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून वसतिगृहातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणून प्रवेश केला, असा आरोपही आंदोलकांनी केला.
अशा विविध संघटना व बाहेरील व्यक्तींना वसतिगृहात प्रवेशास बंदी आणावी यासाठी परिपत्रक जारी करण्याची मागणी कार्यालयीन कर्मचारी संघटनेने केली आहे. तसेच उर्मट, गुंडगिरी व दरमहा खंडणीची भाषा करणाऱ्या संघटनांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. कर्मचारी संघटनेचे सर्वच सदस्य या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे दिवसभर कार्यालयात शुकशुकाट होता. दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले.