नाल्यातील गाळ उपसा, कचरा उचला, शौचालयांची स्वच्छता करा, स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमा, वेळप्रसंगी संबंधितांवर नोटीस बजावून युद्धपातळीवर कामे करून परिसर स्वच्छ करा, असे आदेश दस्तुरखुद्द अतिरिक्त आयुक्तांनी दिल्यानंतरही सहा महिने उलटले तरी धारावीतील चाळकऱ्यांना नरकयातनाच सहन कराव्या लागत आहेत. चाळींच्या आसपासचा परिसरच उकिरडा बनल्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात परिस्थिती गंभीर बनण्याची चिन्हे आहेत, पण पालिका अधिकारी-कर्मचारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत.

धारावीमध्ये असंख्य चाळी उभ्या आहेत. अस्वच्छता या चाळींच्या पाचवीलाच पुजली आहे. त्यापैकीच नेत्रावाला कम्पाऊंड, केरू शेठ चाळ, चौगुले चाळ आदी. सतत दरुगधीयुक्त घाणीच्या पाण्याने तुडुंब भरलेली गटारे, साचलेला कचरा, अस्वच्छ शौचालये, उकिरडय़ातच असलेले पाण्याचे नळ, कुबट दरुगधी, मूषकांचा सुळसुळाट अशा अनेक समस्यांनी येथील रहिवासी हैराण झाले आहेत. यापैकी काही चाळी पालिकेने भाडेपट्टय़ाने दिलेल्या भूखंडावर उभ्या आहेत. मात्र तरीही पालिकेकडून या रहिवाशांना नागरी सुविधा पुरविण्यात येत नाहीत.

या परिसरात नियमितपणे साफसफाई करावी, सुस्थितीतील शौचालये उपलब्ध करावी, पायवाटा स्वच्छ कराव्यात, तुंबलेल्या गटारांची सफाई करावी आदी नागरी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी सातत्याने या विभागातील रहिवासी पालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये करीत होते. अखेर या रहिवाशांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास खारगे यांच्याकडे धाव घेतली. या प्रकरणी सखोल चौकशी करून खारगे यांनी या परिसरात साफसफाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच लोकशाही दिनी रहिवाशांनी पालिकेच्या उपायुक्तांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले. सफाई कामगारांमार्फत दररोज कचरा उचलावा, स्वच्छ मंबई प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून सकाळी व संध्याकाळी घरोघरी फिरून कचरा गोळा करावा, देखरेखीसाठी कनिष्ठ आवेक्षकाची नियुक्ती करावी, कचराकुंडी उपलब्ध करावी, छोटय़ा गटारांमधील गाळ उपसावा, वेळप्रसंगी पोलिसांनी मदत घेऊन साफसफाई करावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. वेळप्रसंगी संबंधितांवर नोटिसा बजावून साफसफाईची कामे पूर्ण करावी, असेही लेखी आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. दस्तुरखुद्द अतिरिक्त आयुक्तांनी आदेश दिल्यामुळे आता नरकयातनांमधून लवकरच आपली सुटका होईल अशी रहिवाशांची समजूत झाली होती. मात्र त्यानंतर अल्पावधीतच खारगे यांची बदली झाली.

खारगे यांनी आदेश दिल्यानंतर आता सुमारे सहा महिन्यांचा काळ लोटला, पण पालिकेचा एकही सफाई कामगार तेथे फिरकलेला नाही. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान तर या रहिवाशांच्या गावीही नाही. तक्रारी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे रहिवाशांना नाकाला रुमाल लावून आणि चिंचोळ्या गल्ल्यांमधून पायाखाली येणारा कचरा चुकवत घर गाठावे लागते. या नरकयातना कधी संपणार असा सवाल ते करीत आहेत, पण त्याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष ना अधिकाऱ्यांचे.