महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांना गुन्हेगारी कारवायांबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूरसह पुणे, सांगली व सातारा या चार जिल्ह्यांतून एक वर्षांसाठी हद्दपार केले आहे. पाटील यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी लावून धरली होती. त्यानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पंढरपूर तालुक्यातील अर्जुनसोंड येथे एका चौकाचे नामकरण करण्याच्या कारणावरून गावातील दलित महिला व मुलांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात मनसे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांचा सहभाग आढळून आला होता. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्जुनसोंड येथे दलित-सवर्ण समाजातील वाढलेले वैमनस्य विचारात घेऊन या प्रकरणास शशिकांत पाटील हेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी पुढे आली होती.