संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना हिंदी चित्रपटांत अभिनय करण्यासाठीही विचारणा झाली होती. मात्र, संतूरच्या प्रेमापोटी आपण हे प्रस्ताव नाकारल्याची कबुली पं. शर्मा यांनी दिली आहे. ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. पं. शर्मा यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सचित्र आढावा घेणारे ‘द मॅन अ‍ॅण्ड हिज म्युझिक’ हे पुस्तक २७ सप्टेंबरला मुंबईत प्रकाशित होत असून या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता शर्मा यांनी वरील माहिती दिली.
चित्रपटांतील अभियनाच्या प्रस्तावांबाबत अधिक माहिती देताना पं. शर्मा म्हणाले, एका चित्रपटाच्या गाण्यासाठीची रंगीत तालीम सुरू होती. चित्रपटाचे संगीतकार जयदेव आणि दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास हे होते. त्यावेळी अब्बास यांनी मला, तुझ्याशी जरा बोलायचे आहे, असे सांगितले. मला वाटले, चित्रपटातील प्रसंग/गाणे याविषयी त्यांना काही सांगायचे असेल, म्हणून मी त्यांच्यापाशी गेलो. ते म्हणाले, ‘सात हिंदुस्थानी’ नावाचा एक चित्रपट मी करतो आहे. चित्रपटातील एका भूमिकेसाठी मला तू योग्य वाटतोस. तू ही भूमिका कर. मात्र, ‘अभिनय’हा माझा प्रांत नाही, असे अब्बास यांना सांगून त्यांनी दिलेला प्रस्ताव मी नम्रपणे नाकारला. खरे तर मी तेव्हा मुंबईत नवीनच होतो. माझे नावही झालेले नव्हते. त्यामुळे ‘करून पाहू या’ असे मनाशी ठरवले असते तर ते करायची संधी होती. पण आयुष्यात संतूर हे माझे ध्येय आणि ध्यास म्हणून मी निश्चित केला होता. त्यामुळे समोर आलेल्या या प्रलोभनाला मी नाही म्हटले. यानंतरही चित्रपटात काम करण्यासाठी काही ऑफर पुन्हा आल्या होत्या, पण आपण त्यानाही नाही म्हटल्याची माहितीही शर्मा यांनी दिली.           
आज संतूरवादक म्हणून माझी ओळख असली तरी खूप पूर्वी मी तबला वादनही करत होतो. जम्मू आकाशवाणी केंद्रासाठी झालेल्या एका कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या संगीत मैफलीचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी हिराबाई यांना तबल्याची साथ मी केली होती, अशी आठवणही पं. शर्मा यांनी सांगितली. ‘द मॅन अ‍ॅण्ड हिज म्युझिक’ हे पुस्तक इना पुरी यांना लिहिले असून नियोगी बुक्सतर्फे त्याचे प्रकाशन होणार आहे. पुस्तकात पं. शर्मा यांची मुलाखत, त्यांच्यावर अन्य मंडळींनी लिहिलेले लेख, दुर्मिळ छायाचित्रे, पं. शर्मा यांनी संगीत दिलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी आदी माहिती आहे.