दीडशे वर्षांची परंपरा असलेली पनवेल नगर परिषद गुरुवारी खऱ्या अर्थाने हायटेक होत आहे. गुरुवारपासून नगर परिषदेचे काम वेबसाइटवरून सुरू होणार आहे. पनवेलच्या ३४ हजार सामान्य खातेधारकांना या वेबसाइटमुळे घरबसल्या आपले विविध विभागांचे सर्व कर भरता येणार आहेत. याच वेळी एसएमएस सेवेच्या शुभारंभाचा योग नगर परिषदेने साधला आहे. गेल्या चार वर्षांपासून नगर परिषदेची कार्यप्रणाली हायटेक होणार याच्या बातम्या झळकत होत्या. मात्र गुरुवारपासून नगर परिषद व सामान्य पनवेलकर जोडले जाणार आहेत.
सामान्य नागरिक व प्रशासन याच्या ई- गव्हर्नन्सचा प्रत्यय पनवेलकरांना या वेबसाइटमुळे अनुभवता येणार आहे. पनवेल नगर परिषदेचा कारभार या निमित्ताने पनवेलकरांना घरातून पाहता व वाचता येणार आहे. घंटागाडी कधी घराखालून जाणार, त्यावर कोणते कर्मचारी असणार याची माहिती स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वेबपेजवर येथे पाहायला मिळेल. स्वाईन फ्लूसारख्या सार्वजनिक समस्येवेळी एकाच वेळी पनवेलकरांना एसएमएसद्वारे व ६६६स्र्ंल्ल५ी’ल्लंॠं१स्र्ं१्र२ँं.िूे या वेबपेजद्वारे घ्यावयाची खबरदारी व उपाययोजनेची माहिती येथे प्रसिद्ध केलेली पाहायला मिळेल. एबीएम कंपनीने ही वेबसाइट डिझाइन केल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली. पनवेलकर घरपट्टी व पाणी पट्टी, बांधकाम शुल्क घरबसल्या कर विभागात भरू शकतील. यापूर्वी वेळ वाया घालवून रांगेत उभे राहून पनवेलकरांना हे कर भरावे लागत होते. त्यामुळे आता पनवेलकरांचा प्रवास खर्चही वाचणार आहे. नगर परिषदेचे बँक खाते बँक ऑफ इंडिया येथे आहे. खातेधारकांनी आपल्या बँकेच्या खात्यावरून ई-पेमेन्टद्वारे हे कर भरण्याची संधी पनवेलकरांना मिळाली आहे. येथे पावती मिळण्याची सोय आहे. नगर परिषदेने तात्काळ वसुलीसाठी १० हॅण्डग्रीड यंत्रे कार्यान्वित केली आहेत. नागरिकांच्या भ्रष्ट कारभारापासून ते निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभार व नवनवीन सूचनांसाठी नगर परिषदेच्या वेबसाइटवर हजेरी लावण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे. येथील एसएमएस सेवा नव्या अद्ययावत पद्धतीने बांधणी केली असल्याने येथे पाण्याची नवीन जोडणी घेणाऱ्यांना फाइलची डिमान्ड नोट तयार होईपर्यंत अपडेट एसएमएस येत राहतील. स्वच्छ भारत अभियान व शहर स्वच्छ आराखडा यासाठी पनवेलकरांना त्यांच्या जवळपासच्या दुगंधी व कचरा साचलेली ठिकाणे येथे नगर परिषदेला दाखविण्यात येईल. या वेबसाइटमध्ये ९ विविध विभाग आहेत. नागरिकांसाठी याआधीही १८००२२७७०१ टोल फ्री नंबर जाहीर केला आहे. त्यावरही तक्रार सामान्य पनवेलकर नोंदवू शकतात. यासाठी नगर परिषदेने कॉल सेंटरची उभारणी केली आहे. पनवेलकरांना या वेबसाइटचा अधिक लाभ होण्यासाठी कुटुंबप्रमुखाचा गॅस एजन्सीकडे नोंदविलेला मोबाइल नंबर नोंदवावा लागेल, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता या सामान्यांच्या वेबसाइटचा लोकार्पण सोहळा नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष चारुशिला घरत यांनी दिली. या सोहळ्याला बँफ इंडियाचे सरदार तारोलोचन सिंग (एनबीजी) उपस्थित राहणार आहेत.

पारदर्शकतेसाठी आपणही जागे व्हा
घरबसल्या नगर परिषदेची माहिती मिळवा, सामान्य पनवेलकरांना आपले मोबाइल क्रमांक नगर परिषदेकडे नोंदवा. तसेच आपण या वेबसाइटवर नोंदविलेल्या तक्रारी व समस्यांवर अधिकारी कारवाई करत नसल्यास त्यांना किती दिवसांमध्ये संबंधित समस्या सुटेल असे नक्की विचारा, परंतु विनम्रतेने. त्यामुळे अधिकाऱ्यांवर काम करण्याचे बंधन व दडपण राहील. वेळोवेळी सांगून समस्या सुटत नसल्यास थेट मुख्याधिकाऱ्यांची भेट घ्या, असे आवाहन मुख्याधिकारी चितळे यांनी केले आहे.