पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात थंडगार व शुद्ध पाणी देणारे कूलर बंद अवस्थेत असल्याने ऐन उन्हाळ्यात रसिक प्रेक्षकांना आपली तहान भागविण्यासाठी घरातूनच थंडगार पाण्याची बाटली आणण्याची वेळ आली आहे. याबाबत नाटय़रसिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह बांधण्यासाठी सात वर्षे लागली. १ जून २०१४ रोजी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले व राज्याचे तत्कालीन सांस्कृतिकमंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते या नाटय़गृहाचे उद्घाटन झाले.  नाटय़गृहाची इमारत बांधण्यासाठी २३ कोटी रुपये खर्च आला. महिन्याचे चार लाख रुपये खर्च करून नगर परिषदेने हे न झेपणारे काटेरी मुकुट पनवेलकरांसाठी परिधान केला आहे. महिन्याच्या वीज बिलापोटी भरल्या  जाणाऱ्या मोठय़ा रकमेने नगर परिषदेला गांगरून सोडले आहे. मात्र शहराच्या पाण्याच्या नियोजनात फोल ठरलेली नगर परिषद नाटय़गृहातील दोन कूलरमध्येही थंडगार पाणी प्रेक्षकांना देऊ शकली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून ऐन उन्हाळ्यात तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावरील पाण्याचे कूलर बंद आहेत. दुसऱ्या मजल्यावर कूलरमधून पाणी येते, पण ते शुद्धीकरण होऊन येत नाही. विशेष म्हणजे या नाटय़गृहामध्ये कलाकारांसाठी वेगळा कूलर नाही. त्यामुळे येथे रसिक प्रेक्षकांसह सर्व लहानमोठय़ा कलाकारांना बाटलीबंद पाणी प्यावे लागते. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  
नाटय़ रसिकांची आणि कलावंतांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन दिवसांत कूलर दुरुस्त केले जातील, त्याचप्रमाणे इतर सुविधांमध्ये ग्रीन रूममधील पडदे नवीन बसविणार आहोत. सिडको वसाहतींमध्ये फलक लावण्याच्या सूचनेवर प्राधान्यांने काम करू. मेकअप रूमची वातानुकूलित यंत्रणा स्वतंत्र असण्यासाठी एसी कंत्राटदाराला सांगितले आहे. त्याचेही काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
    -अरुण कोळी, व्यवस्थापक, पनवेल नगरपरिषद नाटय़गृह