सिडको वसाहतींमधील प्रत्येक दरवाजावरील टकटक वाढली आहे. दार उघडल्यावर समोर असणारे महिला किंवा पुरुष तुमच्या घरात किती मतदार आहेत, अशी विचारणा करत आहेत. मतदारांची नावे काय, वय काय, असे विचारत हसतमुखाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले का, अशी विचारणाही करत आहेत. ही सरकारची मतदार मोजणी नसून राजकीय पक्षांनी स्वतंत्र सुरू केलेले सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षण नुसते मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी नव्हे, तर मतदारांच्या घोडेबाजारात किती खर्च येईल याची आकडेवारीची चाचपणी करण्यासाठी हे सर्वेक्षण आहे. पनवेल विधानसभा निवडणूक २००९ मध्ये धनाच्या आमिषामुळे गाजली. सत्तेसाठी कायपण या क्लृप्त्या वापरून येथे मोठय़ा प्रमाणात मते विकत घेण्याचे प्रकारही घडल्याचे बोलले जात आहे. २००९ च्या तुलनेत दुप्पट झालेल्या मतदारांमुळे राजकीय पक्षांची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने उमेदवारांची धकधक वाढली आहे. त्यामुळेच काही झाले तरी सत्ता मिळवायची या धोरणासाठी किमान किती धन लागेल याची चाचपणी करण्यास राजकीय धुरंधरांनी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे दरवाजावरील टकटक आहे. मतदारांची यामुळे दुपारची झोपमोड होत हे निश्चित. लोकसभाच्या निवडणुकीत मतांचा भाव १ हजारांवर गेल्याने विधानसभेत हा आकडा दुप्पट होण्याची समीकरणे बांधली जात आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात महिला आणि तरुण मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे महिला व तरुणवर्गाला आकर्षित करणारे सर्व उपक्रम येथे विविध राजकीय पक्ष राबवत आहेत. मात्र राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार ही टकटक मतदारांच्या घोडेबाजारासाठी विशेष आणि छुप्या पद्धतीने राबविली जात आहे.