राज्यात पुण्यानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयाला आलेली नवी मुंबई जशी एज्युकेशन हब म्हणून जगात नावरूपास येत आहे तशीच ती डोनेशन हब म्हणूनही ओळखली जात असून केजी ते पीजीपर्यंत डोनेशन दिल्याशिवाय या नवीन शैक्षणिक पंढरीतील पानदेखील हलत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डोनेशनचा हा दर ४० हजारांपासून ४० लाखांपर्यंतचा असल्याचे दिसून येते. प्रवेशाच्या या काळात दलालांचेही चांगभले होत असल्याचे चित्र आहे.
शहरांचे शिल्पकार म्हणविणाऱ्या सिडकोने नवी मुंबईत दळणवळण आणि शैक्षणिक संस्थांचे जाळे कसे विणता येईल याकडे कटाकक्षाने लक्ष दिले. त्यामुळे नवी मुंबईत राहण्यास येणाऱ्याचा दर वाढू शकला आहे. एज्युकेशन हब तयार करण्यासाठी पश्चिम, उत्तर आणि विदर्भातील तसेच देश-परदेशातील शैक्षणिक संस्थांना नवी मुंबई, पनवेल, उरण भागात अतिशय सवलतीच्या दरात भूखंड देण्यास सिडकोने प्राधान्य दिले. सिडकोने सोशलच्या नावाखाली आतापर्यंत ७०० भूखंड विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना दिलेले आहेत. त्यात शेकडो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सीबीएसई, आयसीएसई, विद्यालये, महाविद्यालये, तंत्रनिकेतन, मेडीकल, मॅनेजमेंट, आर्किटेक्चरल, आयुर्वेद, रिसर्च शाळा व कॉलेजसचा समावेश आहे. यातील अनेक शाळांचे प्रवेश पूर्ण झालेले असून सध्या अकरावी, तेरावी, मेडिकल आणि इंजिनीअरिंग कॉलेज प्रवेश अंतिम टप्प्यात आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात हे सर्व कॉलेजेस सुरू होण्याची शक्यता असून पेड सीटच्या नावाखाली आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी लाखो रुपये भरून आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेतलेला आहे. यात सीबीएसई व आयसीएसई (या शाळांची संख्या १७) शाळेतील केजी प्रवेश हा ४० हजार ते १ लाख ४० हजारांपर्यंत डोनेशन घेऊन देण्यात आलेला आहे. इमारत निधी, विकास निधी यांसारख्या नावाखाली डोनेशन घेता येणार नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केलेले आहे, पण या इंग्लिश शाळांच्या गावी हा आदेश नसल्याने त्या हे डोनेशन बिनधिक्कतपणे घेत असल्याचे आढळून आले आहे. इतके डोनेशन दिल्यानंतर प्रवेश मिळेलच याची कोणतीच खात्री नसल्याने अनेक पालकांनी व आजी-आजोबांनी पाल्यांच्या प्रवेशासाठी शाळेबाहेर रात्र जागून काढलेल्या आहेत. काही ठिकाणी तर प्रवेशासाठी रांगेत उभे राहण्यासाठी ५०० रुपये देऊन मजुरांना रांगेत उभे करण्यात आले होते. हे प्रवेश जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पार पडल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सध्या मेडिकल, इंजिनीअरिंग प्रवेशांचा हंगाम असून हा दर चार लाखांपासून ते ४० लाखांपर्यंतचा आहे. एमएमआरडीए क्षेत्रात राहणाऱ्या पाल्यांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळता कुठेही प्रवेश नकोसा असल्याने येथील कॉलेजचा भाव वधारला आहे. राज्यात यावर्षी ६५ हजारांपेक्षा जास्त इंजिनीअरिंगच्या जागा शिल्लक राहणार आहेत. पाल्यांना या तीन शैक्षणिक नगरी सोडून जाण्याची इच्छा नाही. पालकांनाही मुलांना नजरेआड करायची इच्छा नाही. त्यामुळे गुण मिळविणाऱ्या पाल्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सुटला असला तरी योग्य गुण न मिळविणाऱ्या पाल्यांच्या पालकांना पैशांच्या थैल्या तयार ठेवाव्या लागणार आहेत. यातील अनेक व्यवहार झाले असून असे बोगस व्यवहार करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या असून नवी मुंबईत असे व्यवहार करून देणारी टोळी अद्यापही कार्यरत आहे. यातील अनेक जण कॉलेजच्या सेवेत असणारी मंडळी असून पोलिसांचे हात अद्याप त्यांच्यापर्यंत पोहचलेले नाहीत. त्यामुळे नेरुळमधील एका कॉलेजमधील साधा शिपाईदेखील ऑडी गाडी घेऊन फिरत आहे. वर्षांची कमाई एकदाच करणारी या टोळीने संपूर्ण देशासाठी रॅकेट तयार केले असून आम्ही नवी मुंबईतील प्रवेश करणार तुम्ही तुमच्या शहरातील करून द्या, असा अलिखित नियम आहे. त्यामुळेच नुकत्याच पकडलेल्या टोळीची पाळेमुळे हैद्राबादपर्यंत पोहचली आहेत. या टोळीचे म्होरके नवी मुंबईत तळ ठोकून आहेत. त्याच्यापर्यंत पोलीस पोहचत नसल्याने हा गोरख धंदा गेली अनेक वर्षे तेजीत आहे. ही टोळी पोलिसांचेही हात ओले करीत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी..’ असा हा कारभार आहे.