जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर उभी राहणारी अस्ताव्यस्त वाहने आणि अनधिकृत छोटय़ा विक्रेत्यांमुळे सीबीएस ते मेहेर सिग्नल या मार्गावरील कोंडीत सापडलेली एक बाजु मुक्त झाली असली तरी याच मार्गावरील दुसऱ्या बाजुस विक्रेत्यांनी व वाहनधारकांनी आपला मोर्चा वळविल्याने तो परिसर आता कोंडीच्या गराडय़ात सापडला आहे. वाहनधारकांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला वाहनतळ तयार केले. इतकेच नव्हे तर, छोटय़ा विक्रेत्यांनी आपली दुकाने समोरील बाजुस थाटली. त्याचे माहितीदर्शक फलक आधीच्या जागेवर लावले. पोलिसांनी वाहतूक कोंडीपासून या परिसराला कोंडीतून मुक्ती दिली, मात्र त्याचवेळी या मार्गावर वाहने व अनधिकृत दुकाने पुन्हा उभी केली जाणार नाही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गावरील एक बाजु कोंडीतून मुक्त तर दुसरी बाजू नव्याने कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील सीबीएस ते मेहेर सिग्नलमार्गे जाणारा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा व महाविद्यालय आदींमुळे दिवसभर येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असते. शहराच्या विविध भागांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने वाहनांची संख्याही मोठी आहे. या स्थितीत न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील बाजुस रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आणि छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. तसेच न्यायालयात प्रवेश करणेही अवघड झाले. न्यायालयाच्या भिंतीला लागून बाहेरील बाजुस उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमीचीच होती. या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर वाहतूक कोंडीस कारक ठरणारी वाहने आणि छोटय़ा विक्रेत्यांना हटवून लोखंडी जाळी व दोरखंड लावून वाहने अथवा विक्रेते उभे राहणार नाही अशी व्यवस्था केली. नोव्हेंबर महिन्यापासून या ठिकाणी लक्ष दिले जात आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी वाहने उभी केली जाणार नाहीत अथवा विक्रेते दुकान थाटणार नाहीत याची दक्षता घेत आहे. यामुळे या मार्गावरील एका बाजुची वाहतूक कोंडीपासून सुटका झाली. मात्र, या कारवाईमुळे नव्या प्रश्नाला जन्म दिला आहे.
याआधी न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उभी राहणारी वाहने समोरील दुसऱ्या बाजुला गेली. खाद्य पदार्थ व तत्सम विक्रेत्यांनी दुभाजकाच्या पलीकडील भागातील रस्त्यावर जागा व्यापून दुकाने थाटली आहेत. जागा बदलताना संबंधितांनी आपली जागा आधीच्या दुकानासमोर रस्त्याच्या पलीकडे राहील याची काळजी घेतली. ग्राहकांना माहिती देण्यासाठी तसे फलक आधीच्या दुकानाच्या जागेवर झळकावले. आधी समोरील भागात जी स्थिती होती, तीच स्थिती वाहनधारक व विक्रेत्यांमुळे दुसऱ्या भागात झाली आहे. यामुळे एका बाजुकडील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली असली तरी दुसऱ्या बाजुकडे ती नव्याने निर्माण झाल्याचे दिसत आहे. या विक्रेत्यांनी रस्त्यालगतचा बराच भाग व्यापला आहे. वास्तविक, या पट्टय़ात शाळा व महाविद्यालये तसेच शहरात सर्वत्र जाणाऱ्या बसचे थांबे आहेत. सकाळ व सायंकाळी शालेय विद्यार्थी व नागरिकांची गर्दी असते. छोटय़ा विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे या बाजुकडील वाहतुकीला फटका बसत आहे. वाहतूक पोलिसांनी समोरील भागात जशी दक्षता घेतली, तशी दक्षता समोरील बाजुस घेतली नसल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.