लोकसभा निवडणुकीचा फायदा फेरीवाल्यांना झाला आहे. सरकारी अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने फेरीवाल्यांना मोकळे रान मिळाले आहे. मोकळा फूटपाथ दिसला की तेथे टपऱ्यांचे हात-पाय पसरण्याचे काम फेरीवाले करताना दिसतात. खांदेश्वर, कामोठे, कळंबोली आणि खारघर या सिडको वसाहतींमध्ये फेरीवाल्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते आहे.
काही स्थानिक पुढाऱ्यांसमोर आपले नशिबाचे रडगाणे गाऊन मोकळ्या फूटपाथवर बिनभाडय़ाचे बस्तान बसवायचे, अशी गनिमीकाव्याची भूमिका समोर घेऊन आपुलकीच्या जिवावर फेरीवाल्यांनी सिडको वसाहतीमध्ये जाळे पसरविले आहे. काही पुढाऱ्यांचा याच फेरीवाल्यांच्या जिवावर उदरनिर्वाह सुरू आहे. सिडकोने कळंबोलीसारख्या वसाहतींमध्ये हॉकर्सझोन बांधले आहेत. मात्र फेरीवाले जास्त आणि हॉकर्सझोनमधील गाळे अपुरे असल्याने कळंबोलीत अनियंत्रित फेरीवाल्यांवर सिडकोचा अंकुश राहिला नाही. अशीच परिस्थिती खांदेश्वर शहराची आहे.
सिडकोने या शहरात सकाळी लाखो रुपये खर्च करून अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची आणि दुपारनंतर त्याच ठिकाणी फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडायचे हा खेळ नित्याचा बनला आहे. त्यामुळे सिडकोच्या तिजोरीतील लाखो रुपये वाया जात आहेत. शहरातील सक्रिय राजकारणात आज फेरीवाल्यांच्या मतांचा आकडाही मोठा असल्याने राजकीय पक्षांकडून त्यांना दुखवले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कळंबोली येथील सेक्टर ८ मधील कारमेल विद्यालयासमोरील एका मोकळ्या फूटपाथवर रातोरात मुल्ला नावाच्या व्यक्तीने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. विद्यालयासमोरील गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवाशांनी या मुल्लाची विचारपूस केली. त्यावेळी मुल्ला याला राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने आशीर्वाद दिल्याने धंदा लावण्यासाठी ही फूटपाथ दिल्याचे रहिवाशांना कळाले. हा राजकीय पुढारी सेक्टर १० मध्ये राहत असल्याने रहिवाशांनी मुल्लाने राजकीय पुढाऱ्याच्या घरासमोर धंदा लावण्याचा अट्टहास मुल्लाकडे धरला. मात्र पुढाऱ्याच्या दहशतीपुढे रहिवाशांचे काही चालले नाही. अखेर १५ दिवसांनी पुन्हा रहिवाशांना जाग आली. त्यांनी पुन्हा आपला मोर्चा भाजीविक्रीच्या धंद्याकडे वळविला. त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाली. मुल्ला या भाजीविक्रीच्या ठिकाणी नव्हता. तेथे दुसरीच दोन मुले काम करत असल्याचे दिसून आले. मुल्लाला मोबाइलवरून रहिवाशांनी संपर्क साधल्यावर मुल्ला हा उत्तर प्रदेशला असल्याचे कळले. मुल्ला हा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारा आहे. तो मूळगावी गेल्याने त्याने हा भाजीविक्रीचा धंदा सांभाळण्यासाठी दोन मुले कामाला ठेवल्याचे या दोन मुलांनी सांगितले.