लाकडाऐवजी इलेक्ट्रिक शवदाहिनीचा वापर करण्यासाठी एकीकडे पालिकेला जनजागृती करावी लागत असतानाच विलेपार्ले व अंधेरी येथील नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेत, निधी जमवून पारसीवाडा स्मशानभूमीमध्ये पीएनजी शवदाहिनी बसवल्या. निवडणुकांमुळे लोकार्पण सोहळा लांबला असला तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या शवदाहिनीची सेवा सुरूही करण्यात आली असून गेल्या वीस दिवसात पन्नास टक्केअंत्यसंस्कारांसाठी पर्यावरणस्नेही मार्ग निवडण्यात आला आहे. 

इलेक्ट्रिक शवदाहिनीची सोय असतानाही धार्मिक भावनांसाठी लाकडाचा पर्याय निवडला जातो. मात्र एका अंत्यसंस्कारासाठी तब्बल ३०० किलो लाकूड जाळावे लागते. याचा खर्च पालिका उचलत असली तरी पर्यावरणाची हानी मात्र रोखली जात नाही. सहार रोडवरील पारसी स्मशानभूमीतही आतापर्यंत केवळ लाकडाचाच पर्याय उपलब्ध होता. मात्र दर महिन्याला सुमारे १०० अंत्यसंस्कार होत असलेल्या या स्मशानभूमीत इलेक्ट्रिक वाहिनीचा पर्याय हवा, यावर मार्च, २०१० मध्ये समविचारी मंडळींनी एकत्र येऊन चर्चा केली, असे मराठी मित्र मंडळाचे विश्वस्त डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले. पालिकेच्या मदतीवर अवलंबून राहण्याऐवजी नागरिकांनीच एकत्र येऊन पालिकेच्या पाठीशी उभे राहायला हवे, या भावनेतून मराठी मित्र मंडळाने, सावली चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने निधी जमवण्यास सुरुवात केली. मंडळावरील विश्वास आणि चांगल्या कामासाठी पार्लेकरांनीही भरभरून मदत केली आणि एका वर्षांत तब्बल ३७ लाख रुपयांचा निधी जमा झाला, असे मराठी मित्र मंडळाचे सचिव शरद पटवर्धन म्हणाले.
मराठी मित्र मंडळासोबत अंधेरी येथील श्री व्यापारी मित्र मंडळानेही पुढाकार घेतला व एकाऐवजी दोन शवदाहिन्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेचा आरोग्य विभाग तसेच स्थानिक नगरसेवकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. या शवदाहिनीसाठी आवश्यक असलेली पीएनजीची पाइपलाइन पश्चिम द्रुतगती मार्गाखालून आणावी लागली. मात्र महानगर गॅसकडून त्याबाबत तात्काळ पावले उचलली गेली व एका महिन्यात काम पूर्ण झाले. यासाठी मराठी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनायक देवधर, सुभाष पेठे, माधव खाडिलकर यांनी पुढाकार व मेहनत घेतली. कार्यालयीन परवानगी पूर्ण होऊन शवदाहिनीची सेवा सुरू होण्यासाठी दोन वर्षांचा काळ गेला असला तरी पालिका व नागरिकांच्या पुढाकाराने अंधेरी व विलेपार्लेच्या नागरिकांना पर्यावरणस्नेही सुविधा मिळाली आहे. या शवदाहिनींचा लोकार्पण सोहळा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होत आहे.
लाकूड जाळल्याने होत असलेली पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन पालिकेनेही पीएनजी शवदाहिनीचा पर्याय स्वीकारला असून शहरातील सर्वच स्मशानभूमी पर्यावरणस्नेही करण्याची सुरुवात होत आहे. या आर्थिक वर्षांत शिवाजी पार्क, अंबोली, बाभई, चरई, शीव, उंदराई-मालाड, डहाणूकर वाडी, दौलतनगर या आठ स्मशानभूमीमध्ये पीएनजीवर आधारित शवदाहिनी लावली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात १२ स्मशानभूमीत ही सोय केली जाईल.

पारसीवाडा स्मशानभूमी
अंधेरी पूर्व व विलेपार्ले पूर्वच्या रहिवाशांसाठी सेवा.
दर महिन्याला सुमारे १०० अंत्यसंस्कार होतात.
 ५ नोव्हेंबरपासून पीएनजी शवदाहिनीची सुरुवात
आतापर्यंत शवदाहिनीत २७ अंत्यसंस्कार
अधिकाधिक अंत्यसंस्कार शवदाहिनीत करण्यासाठी जागृती
अंत्यसंस्कारासाठी पालिकेकडून मोफत लाकडे दिली जातात. 
एका दहनासाठी सुमारे ३०० किलो लाकडे.
 त्यासाठी पालिकेला २५०० रुपये खर्च.
गॅसदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी सुमारे १३०० रुपये खर्च.