सर्वोच्च न्यायालयाने १२ वर्षांखालील बालगोविंदांना केलेली मनाई आणि उच्च न्यायालयाने आवाजमर्यादेसह घातलेले अनेक र्निबध यामुळे मुंबई व परिसरातील दहीहंडी उत्सवांत अनेक मंडळांनी ‘आवाज नीचे’ केला असला तरी विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांची जाहिरातबाजी आणि गोविंदा पथकांचा उत्साह मात्र टिपेलाच होता. न्यायालयाचे र्निबध काही बडय़ा नेत्यांच्याच मंडळांनी धाब्यावर बसवले, त्याचबरोबर गोविंदा पथकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक भागांत कोंडीची परंपरा यावर्षीही कायम होती.
आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून प्रचाराची हंडी उंचच उंच उभारण्यात मनसेचे आमदार राम कदम यांनी आघाडी घेतली. इशा कोप्पीकरपासून मधुर भांडारकपर्यंत विविध थरांतील सेलिब्रेटी आणि २२ वर्षांच्या तरुणांपासून ते १०४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेपर्यंतचे स्थानिक रहिवासी यांना एकाच मंचावर आणणाऱ्या राम कदम यांनी उंचच उंच थर लावायला आलेल्या गोिवदा पथकांकडे मात्र साफ दुर्लक्ष केले.  
देशातील सर्वात मोठी दहीहंडी अशी आपल्याच उत्सवाची स्वत:च पाठ थोपटणाऱ्या कदम यांनी यंदाच्या दहीहंडीचा पुरेपूर वापर आपल्याच जाहिरातीसाठी केला. ठाण्यातील मोठय़ा गोविंदा उत्सवाला जाता जाता गोविंदा पथके लाल बहादूर शास्त्री मार्गावरून कदम यांच्या दहीहंडीकडे वळत होती. गेल्या वर्षी शाहरुख खान, जितेंद्र अशा सेलिब्रेटींना या उत्सवात आणणाऱ्या कदम यांच्या दहीहंडी उत्सवात यंदा मात्र दुपापर्यंत इशा कोप्पीकर, मधुर भांडारकर, कायनात अरोरा यांनी हजेरी लावली होती. संध्याकाळी आमिर खान, प्रियांका चोप्रा येणार असल्याची चर्चा होती. उपस्थित तारकांच्या पदन्यासामध्ये रस घेताना कदम यांनी हंडीसाठी आलेल्या गोविंदा पथकांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले. एकीकडे ‘बेबी डॉल मै सोने दी’ या गाण्यावर ठुमकणारी कायनात अरोरा, तर दुसरीकडे जिवाची बाजी लावून सात थर उभारणारे गोविंदा असे परस्परविरोधी चित्र येथे दिसत होते. आमदार राम कदमही गेल्या पाच वर्षांत आपण केलेल्या कामांचा आढावा ध्वनिक्षेपकावरून वारंवार घेत होते. त्यासाठी गोविंदा पथकांना थर लावण्याबाबत सूचना देणाऱ्या मार्गदर्शकाचा आवाज ते सतत थांबवत होते. त्यामुळे हा उत्सव आमच्यासाठी की निवडणुकीच्या जाहिरातबाजीसाठी, असा प्रश्न काही गोविंदा पथकांना पडला होता. गोविदांच्या सुरक्षेसाठीही फारशा उपाययोजना नव्हत्या. मात्र अपघात घडलाच तर दोन रुग्णवाहिकांची सोय होती.
पाल्र्यात नियमांची धडकी
अर्थात कानाला दडे बसणारा आवाज, सुरक्षेची ऐशी की तैशी करून लावले जाणारे व कोसळणारे थर, त्यावरून पडणारे सहा-सात वर्षांचे चिमुरडे बालगोविंदा.. असा नेहमीचा साज व माज नसल्याने रस्त्याकडेला उभे राहून शांत व सुसंस्कृत उत्सवाची मजा परिसरातले बाळगोपाळ, महिला व ज्येष्ठही घेत होते.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना दहीहंडी उत्सवाच्या राजकीय आयोजकांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झालेली अवस्था मुंबईच्या नाक्यानाक्यावर दिसत होती. विलेपार्ले येथील दहीहंडीही त्यापैकीच एक. दरवर्षी सुमारे शंभर पथके या उत्सवात येतात. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा उत्सवच रद्द करण्याचा निर्णय आमदार कृष्णा हेगडे यांनी घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी उत्सवाचे आयोजन केले खरे, मात्र येत्या निवडणुकीआधी कायद्याच्या चौकटीत राहण्याची पुरेपूर खबरदारीही ते घेत होते.
हंडीची उंची साधारण ३० फुटांवर ठेवण्यात आली होती. सकाळी १० वाजल्यापासूनच विलेपार्ले व परिसरातील पथके याठिकाणी जमू लागली. काहींनी सात थर लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र केवळ सहाच थर.. ही अट कायम होती. सहा थरांसाठी सहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जात होते. मात्र त्यापेक्षा अधिक उंची लावू नये, असे आवाहन वारंवार करण्यात येत होते व तसा फलकही लावण्यात आला होता. काही पथकांमधील बालगोविंदा बारापेक्षा कमी वयाचे असल्याचे दिसत होते. त्या वेळी बक्षीस देण्याआधी आयोजकांकडून हटकून चौकशी करण्यात येत होती. सोबतचे पथक मात्र बालगोविंदांचे वय १३ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगून वेळ मारून नेत होते. सुरक्षेसाठी वरच्या थरावरील गोविंदाला हेल्मेट घालण्याची काळजी काही पथकांनी घेतली होती आणि आयोजकांनी रुग्णवाहिकेची सोयही केली होती. मात्र सहा थर लावता लावता कोसळणारे गोविंदा पाहताना सुरक्षिततेसाठी आणखी व्यवस्था गरजेची आहे, असे वाटत होते. डीजेचा स्वरही या वेळी कमीच होता आणि त्यातही गोविंदांच्या दणकेबाज गाण्यांपेक्षा न्यायालयाच्या सूचना ऐकवण्याकडे आयोजकांचा कल अधिक होता. आयोजकच ताक फुंकून पीत असल्याने पोलिसांवरही सुरक्षेचा ताण नव्हता, हे विशेष.
दादरमध्ये प्रथमच मर्यादेचे भान
यंदाच्या दहीहंडीला न्यायालयाच्या आदेशाचे कुंपण असल्याने दादरमधील वातावरण ‘जरा सांभाळून’ अशाच प्रकारचे होते. कुठल्याही कारणाने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही आणि आपल्याला कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी घेतल्याचे किमान ‘देखावे’ करण्याची काळजी घेताना आयोजक दिसत होते.
दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी सकाळी-सकाळी कर्कश्श आवाजाने कानाचे पडदे फाडणारे मंडळाचे ट्रक यंदा काहीसे शांत होते, फक्त दादर स्टेशनजवळची आयडियलची गल्ली तितकी गजबजलेली होती. नक्षत्र मॉलला लागून असलेली मनसेची हंडी, त्याच्या पुढे काही अंतरावर असलेली भाजपची हंडी आणि आयडियलसमोरील ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ची हंडी लोकांची गर्दी खेचत होती. सुरक्षिततेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी खेळण्यास मनाई असल्याने, आयोजक प्रथम मंडळांकडून प्रत्येकाच्या वयाचा दाखला सादर करण्यास सांगत होते, त्यानंतरच त्यांना थर रचण्याची परवानगी देण्यात येत होती. पण असे असले तरी, सर्वात वरच्या थरावर चढलेल्या चिमुरडय़ा बालगोपालाला पाहून हा नक्की १२ वर्षांपेक्षा मोठा आहे का, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नव्हता. त्यात त्यांच्या पाठीवर ‘संरक्षणासाठी’ केवळ पोहताना वापरला जाणारा बलून आणि काहींच्या डोक्यावर हेल्मेट होते. काही ठिकाणी दहीहंडीच्यावर रोपवेची सोय होती, पण त्याचा वापर करण्यास मंडळांनी स्वारस्य दाखवले नाही. मनसेने सुरक्षिततेसाठी चार मॅट्सही टाकले होते. दुपापर्यंत पाच ते सात थर लावण्याची परवानगी आयोजकांनी दिली होती आणि प्रत्येक मंडळाला त्यांच्या यशस्वी सलामीनंतर मानचिन्ह आणि ठरावीक रक्कम देऊन गौरवण्यात येत होते.
आवाजाची मर्यादा आयोजकांकडून बऱ्यापैकी पाळली गेली होती, पण पाणी फेकण्याचा उत्साह मात्र कमी झाला नव्हता. मनसेच्या दहीहंडीजवळ एक पाण्याचा फवारा लावला होता, प्रत्येक मंडळाच्या विजयी सलामीनंतर दोन मिनिटांसाठी फवाऱ्यातून पाणी उडवून जल्लोष साजरा केला जात होता. लोकही चाळींमधून वेळोवेळी पाणी टाकत होतेच.
वरळीमध्ये हंडीचा उंच आवाज
वरळी परिसरात पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडीत आवाजाची मर्यादा पाळली गेली नव्हती. या उत्सवात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. या ठिकाणी मुंबई आणि परिसरातील गोविंदा पथकांनी सात ते नऊ थर लावून सलामी दिली. ही हंडी लावलेल्या जांभोरी मैदानाची मात्र पार दुर्दशा झाली होती. दहीहंडीच्या पूर्वतयारीसाठी मैदानात आणलेल्या मोठय़ा क्रेन्स आणि ट्रकमुळेही सर्वत्र चिखल झाला होता.
 वार्ताकन : प्रसाद रावकर, प्राजक्ता कासले, रोहन टिल्लू, मृणाल भगत
जबाबदारी पथकांवरच..
जास्तीतजास्त सहाच थर लावावेत, १२ वर्षांखालील बालकांना थरावर चढवू नका, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, नियमांचे उल्लंघन झाल्यास पथकांवर जबाबदारी राहील.. विलेपार्ले येथील नेहरू रोडवर आमदार कृष्णा हेगडे प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात याच घोषणा वारंवार ऐकू येत होत्या. सर्वोच्च न्यायालयाने उंची व वयावरील बंधने शिथिल केल्यानंतरही आयोजक ताक फुंकून पीत होते.

डेसिबल मोजणार कोण?
घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहीहंडीत गोविंदांच्या थराशी स्पर्धा करणारे ध्वनिवर्धकांच्या चढय़ा स्वरांचेही एकावर एक थर लावले जात होते. चार ध्वनिक्षेपकावरून अत्यंत मोठय़ा आवाजात हादरा देणारे कर्णकर्कश्श संगीत सुरू होते. मात्र उपस्थित पोलिसांच्या कानांत मात्र तो सूर पोहोचतच नव्हता!

प्रचाराचा घाट
विविध दहीहंडी उत्सवात कलावंतांच्या हजेरीत आता मालिका वा चित्रपटांच्या प्रचाराचा व्यावसायिक हिशेबीपणाही शिरू लागला आहे. यात मालिका वा चित्रपटाचीही जाहिरात होते आणि आयोजकांचीही जाहिरात होते! आयडियल सांस्कृतिक आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’तर्फे दादरमध्ये आयोजित दहीहंडीमध्ये ‘माझे मन तुझे झाले’ आणि ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’मधील हरीश दुधारे, स्वरदा तिंगले, साक्षी तिसगावकर, रश्मी अनपट इत्यादी कलाकारांनी हजेरी लावली. दुपारी एकपर्यंत त्यांनी खेळाची मजा लुटली आणि नंतर मंडळांना शुभेच्छा देत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

छोटय़ांची माघार!
न्यायालयांच्या र्निबधांचे काटेकोर पालन न होण्याच्या भीतीने अनेक छोटय़ा आयोजकांनी या वर्षी दहीहंडय़ाच लावल्या नाहीत. यामुळे छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये हा उत्सव न झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यामुळे गोविंदा पथकांवरही हंडय़ा शोधण्याची वेळ ओढवली होती.